मुंबईमधील मालवणी येथे राहणाऱ्या एका जोडप्याला महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी चार लाख रुपये दिले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कशासाठी. तर या जोडप्याने लॉकडाउनच्या कालावधीमध्ये १५०० गरजू व्यक्तींना अन्नधान्य घेण्यासाठी मदत केली. यासंदर्भातील बातमी छापून आल्यानंतर महिंद्रा यांनी हा निर्णय घेतला आहे. फयाज शेख आणि मिझगा शेख या दोघांनी स्वत:च्या प्रोव्हिडंट फंडाच्या खात्यामधून पैसे काढून गरजूंना मदत केली. हे पैसे दोघांनाही त्यांच्या नवीन घरासाठी ठेवले होते. मात्र हे पैसे त्यांनी करोनाच्या काळात दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्यांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. महिंद्रा यांनी ही बातमी वाचल्यानंतर या जोडप्याच्या कामाने ते खूपच प्रभावित झाले. शेख दाम्पत्य करत असणाऱ्या मदतकार्यामध्ये अनेक दानशूर व्यक्ती पुढे आल्या. केपीएमजी, टेलीकॉम कंपनीचे व्हाइस प्रेसिडंट आणि आयटी कन्सल्टन्सीमधील एका टीम लीडरने आर्थिक मदत करत दीड लाखांचा निधी जमा केला.

“आम्हाला या कार्यामध्ये मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो,” असं फयाज सांगतो. फयाज आणि मिझगाच्या कामाबद्दल २४ जुलै रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर त्यांना मदतीसाठी अनेकजण फोन करत आहेत. धान्यासाठी विचारणा करणाऱ्यांचे फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे. “मला कोणालाही नकार द्यायचा नाहीय. त्यामुळेच मदतीचे पैसे हाती आल्यानंतर आम्ही त्यामधून लगेच सामान विकत घेतो,” असं फयाज सांगतो.

मिझगा  मालवणीमधील अंबुजावाडी येथे मुलांची शाळा चालवते. तिने आता धान्याची मतद केल्यानंतर या भागातील गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. “माझ्या शाळेमध्ये शिकणाऱ्या सहापैकी पाच विद्यार्थी दहावीच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास झाले आहेत. मात्र त्यांच्या पालकांना या मुलांच्या शिक्षणाचा पुढील खर्च उचलणे शक्य होणार नाही. मात्र त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच आम्ही त्यांच्या ज्युनियर कॉलेजची फी भरण्याचा निर्णय घेतला आहे,” असं मिझगा सांगते. मिझगा यांनी मालवणीमध्ये २०१० साली बालवाडी सुरु करण्यापासून सुरुवात केली होती. मागील १० वर्षांमध्ये मिझगाने येथे एक छोटी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली आहे. सरकारने या शाळेला अद्याप परवानगी दिली नसली तरी येथे विद्यार्थ्यांना जवळजवळ मोफत शिक्षण दिले जाते.

फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया

अंबुजावाडीमध्ये राहणाऱ्या नसीर शाह यांची मुलगी राहील हिने दहावीच्या परीक्षेत ५४ टक्के गुण मिळवले आहेत. माझ्या मुलीने कंप्युटरसंदर्भातील कोर्स करावा अशी माझी इच्छा असल्याचे नसीर सांगतात. “आमच्या घरी खाणारी अनेक तोंडे आहेत. माझे पती रिक्षा चालक होते. मात्र त्यांच्या पायाला दुखापत झाल्यापासून त्यांना काम करता येत नाही. शेख दाम्पत्याने राहीलने किमान १२ वी पर्यंत शिकावं अशी गळ घातली. त्यांनी केवळ राहीलच्या शिक्षणाचा खर्चच नाही उचलला तर माझी दुसरी मुलगी खुशनूमा हिच्या लग्नसाठीही त्यांनी पाच हजरांची मदत केली होती,” असं नसीर सांगतात. या भागामध्ये राहणारे फळ विक्रेते अली अहमद शाह हे माझ्या मुलाने शेख दाम्पत्याला गरजू व्यक्तींपर्यंत मदत पोहचवण्यासाठी मदत केल्याचे मोठ्या अभिमानाने सांगतात. “माझ्या मुलाने त्यांच्याबरोबर काम करताना कोणाला किती मदतीची गरज आहे याची यादी तयार केली. माझा लहान मुलगा रिझवान याने दहावीला ५० टक्के मार्क मिळवले आहेत. आता शेख दाम्पत्याने त्याच्या कॉलेजची फी भरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. माझा मोठा मुलगा इम्रान याच्या कॉलेजची फी भरतानाच माझी तारेवरची कसरत होत असतानाच रिझवानला शेख दाम्पत्य मदत करणार असल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे,” असं अली अहमद सांगतात. १० वर्षांपूर्वीच आईचे निधन झाल्याने रिझवान आणि इम्रान हे घरातली सगळी कामं स्वत:च करतात.

लोकांनी केलेल्या मदतीमधून मिळालेल्या निधीपैकी काही पैसे शेख दाम्पत्याने वयस्कर लोकांच्या औषधांसाठी खर्च केले आहेत. अनेक आजार असल्याने घरीच थांबवं लागणाऱ्या वयस्कर लोकांच्या औषधाचा खर्च या निधीमधून करण्यात आला आहे.