डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात जन्मानंतर नवजात बालकांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा देणारे इन्क्युबेटर उपलब्ध आहे. पण, बालरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने एका नवजात बालकाचा मृत्यु ओढविल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
डोंबिवलीजवळील दावडी गावातील मिनुकुमारी गील (वय २०) या गर्भवती महिलेला कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात शनिवारी रात्री दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी या महिलेने एका मुलीला जन्म दिला. बाळ नाजूक
असल्याने व बालरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने उपस्थित डॉक्टरांनी गील दाम्पत्याला शीवच्या लोकमान्य टिळक रूग्णालयात बाळाला
हलविण्याचा सल्ला दिला. तेथे जागे अभावी केईएम व वाडिया रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे दाखल करूनही बाळाला कोणताही फरक न पडल्याने गील दाम्पत्याने पुन्हा बाळाला डोंबिवलीत उपचारासाठी आणण्याचा निर्णय घेतला. पण वाटेतच बाळाचा मृत्यू झाला. याबाबत शास्त्रीनगर रूग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रेखा सारस्वत यांनी सांगितले, रूग्णालयात वॉर्मरची सुविधा आहे. पण बालरोगतज्ज्ञ नाही. मिनुकुमारी यांची प्रसुती नैसर्गिक झाली होती. बाळाला श्वसनाचा त्रास होत होता. आईला कांजण्या आल्या होत्या. त्यामुळे त्यांना उपचारासाठी शीव येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.