राज्यातील एकू ण करोनाबाधित पोलीस अधिकारी, अंमलदारांची संख्या बुधवारी २० हजारांपुढे गेली. या पंधरवडय़ात पोलीस दलातील बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढल्याची नोंद करण्यात आली. या काळात चार हजार ७०९ पोलिसांना संसर्ग झाल्याची माहिती राज्य पोलीस मुख्यालयाने दिली.

बुधवारी करोनाग्रस्त पोलिसांचा आकडा २०,००३ वर पोहोचला. यापैकी १६ हजार ७१ पोलीस करोनामुक्त झाले. २०४ जणांचा मृत्यू झाला तर तीन हजार ७२८ जणांवर विविध रुग्णालयांत, करोना केंद्रांत उपचार सुरू आहेत. मुख्यालयातील नोंदीनुसार ३१ ऑगस्टला १५ हजार २९४ पोलीस बाधित होते. त्यापैकी १५६ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरच्या पंधरवडय़ात बाधितांच्या संख्येत चार हजार ७०९ ने भर पडली. सहा महिन्यांच्या सरासरीपेक्षा रुग्णांचा आकडा जास्त असल्याने आणि ४८ अधिकारी, अंमलदारांचा मृत्यू झाल्याने पोलीस दल चिंतेत आहे.

सुरुवातीच्या काळात पोलीस दलातील करोना संक्रमणाचा वेग जास्त होता. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांचे नागरिकांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण अधिक होते. टाळेबंदीच्या अंमलबजावणीपासून स्थलांतरित मजुरांची पाठवणी, बाधितांचा शोध, प्रतिबंधित क्षेत्र आणि विलगीकरण केंद्राबाहेरील पहारा, विविध धर्म आणि समाजाच्या मोठय़ा सणांसाठी बंदोबस्त आदी जबाबदारी पोलिसांवर होती. टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह गुन्ह्य़ांची नोंद, तपास आदी नियमित कामांचे प्रमाणही वाढले. त्यामुळे पोलीस दलातील करोना संक्रमण वाढले असावे, असा अंदाज मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करतात.

‘एनसीबी’चा अधिकारी करोनाबाधित; सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मंदावण्याची शक्यता

* अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी अंमलीपदार्थाचा संबंध आहे का, हे तपासणाऱ्या केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकात (एनसीबी) करोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी केलेल्या प्रतिजन चाचणीतून पथकातील अधिकारी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकातील सर्वच अधिकारी, अंमलदारांनी चाचणी करून घेतली. त्यांचे अहवाल अपेक्षित आहेत. अहवाल सकारात्मक असल्यास करोनामुक्तीसाठी पथकाकडून वैद्यकीय नियम, सूचना किंवा प्रक्रिया पाळली जाईल.

* बुधवारी एनसीबीने सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि टॅलेंज मॅनेजर जया साहा यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार मोदी सकाळी दहाच्या सुमारास बॅलॉर्ड पीअर येथील एनसीबीच्या विभागीय कार्यालयात हजर झाली. मात्र तिच्याकडे चौकशी सुरू करण्यापूर्वीच अधिकाऱ्याच्या प्रतिजन चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चौकशीसाठी कार्यालयात आलेल्यांना माघारी पाठवण्यात आले. त्यांना येत्या काळात पुन्हा बोलावले जाईल, असे मल्होत्रा यांनी सांगितले.