जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील घटना
जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान सात रुग्णांच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग झाला. शस्त्रक्रियेसाठी वापरलेल्या साधनांचे र्निजतुकीकरण न केल्याने सात रुग्णांच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग झाल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसह अन्य तीन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ट्रॉमा केअर रुग्णालयात सात रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सातही रुग्णांच्या डोळ्यांमध्ये जंतुसंसर्ग झाला असून यातील एका रुग्णाची दृष्टी गेली आहे. चार रुग्णांची दृष्टी सुधारली असून दोन रुग्णांची दृष्टी अजूनही सुधारण्याच्या अवस्थेत आहे. जंतुसंसर्ग झाल्याचे लक्षात आल्यानंतर सातही जणांना केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले आणि तिथे त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली.
बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबंस सिंग बावा यांची बदली करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया करणारे डॉ. अरुण चौधरी यांच्यासह त्यांना साहाय्य करणाऱ्या अन्य दोन डॉक्टरांना निलंबित केल्याचे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सांगितले.
र्निजतुकीकरणाचा अभाव
यासंबंधी कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी चौकशी करून पालिकेला अहवाल दिला आहे. रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी वापरात असलेल्या साधनांचे योग्य रीतीने र्निजतुकीकरण करण्यात आले नव्हते. तसेच शस्त्रक्रिया करताना प्रमाणित पद्धत वापरली गेली नाही, असे या अहवालात नमूद केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 12:24 am