मुंबईत शनिवारी ४१ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ६९६ वर पोहचली. करोनाचे शनिवारी ८८४ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांचा आकडा १८,३९६ वर गेला आहे. मृतांपैकी १४ मृत्यू ७ ते १२ मे दरम्यानचे आहेत.

मुंबईतील रुग्णाच्या आकडेवारीबरोबरच मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. मृतांचा आकडा ७०० पर्यंत पोहोचला आहे. मात्र मुंबईतील मृत्यूदर ३.७ टक्के  आहे. मृत्यूची नोंद झालेल्या ४१ जणांपैकी १७ जणांना कोणतेही दीर्घकालीन आजार नव्हेत. तर दोन मृतांचे वय हे ४० वर्षांपेक्षा कमी होते. १२ रुग्ण हे ४० ते ६० वर्षांदरम्यानचे, तर ६० वर्षांवरील २७ जण आहेत. शनिवारी २३८ जण करोनामुक्त बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ४८०६ जण करोनामुक्त झाले आहेत. तर आणखी ६४५ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीकडील पश्चिमेचा भाग असा साधारण साडेसहा लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेच्या के पश्चिम विभागात  करोनाचे ९०० रुग्ण आढळल्यानंतरही हा प्रभाग नियंत्रणाखाली आणण्यात यश आले आहे. या विभागात आठवडय़ापूर्वी १५५ करोनाबाधित परिसर होते. ती संख्या १३ वर आली आहे. पावणेतीनशे रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

* रुग्णवाहिकांची कमतरता

रुग्णवाहिका मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे पालिकेने आता बेस्ट बसगाडय़ांचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्याचे ठरवले आहे. तसेच वाहतूक आयुक्तांनी पुरवलेल्या वाहनांचाही रुग्णवाहिका म्हणून वापर करण्यात येणार आहे. या रुग्णवाहिकांमध्ये चालक आणि मदतनीस यांना संरक्षक साधनांचे संच देण्यात येणार आहेत. रुग्णांची ने-आण करण्यासाठी आतापर्यंत बेस्टच्या ७० गाडय़ा, एसटीच्या १५ गाडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. तीव्र बाधित रुग्णांची ने-आण करण्यासाठी १०८ रुग्णवाहिका आणि सेवेतील ६० रुग्णवाहिका सेवा बजावत आहेत. तसेच पालिकेने २० रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. तरीही रुग्णवाहिकाची कमतरता जाणवत आहे.

* ठाणे जिल्ह्य़ात २८९ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी २८९ नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ३४३२ वर पोहचली. शनिवारी ठाणे शहरात सर्वाधिक ९४ आणि नवी मुंबईत ८० नवे रुग्ण आढळून आल्याने या दोन्ही शहरातील रुग्णांची संख्या हजाराच्यावर गेली आहे. जिल्ह्य़ात एका दिवसात ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १०५ झाला आहे. कल्याण-डोंबिवली शहरात ३५, भिवंडी शहर ३, उल्हासनगर १२, बदलापूर शहर १९, मिरा-भाईंदर शहर २१ आणि ठाणे ग्रामीणमध्ये २४ रुग्णांची नोंद करण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्य़ात ५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यात नवी मुंबईतील ३ तर कल्याण आणि मिरा-भाईंदरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

* पनवेलमध्ये ३५२ रुग्ण 

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारी १२ करोनाबाधित आढळले. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ३५२वर पोहचली आहे. त्यापैकी कामोठे वसाहतीमध्ये सर्वाधिक ९९ रुग्ण आहेत. खारघरमध्ये ५७, नवीन पनवेल ३१ आणि कळंबोलीत २७ रुग्ण आढळले आहेत. पनवेलमधील ३५२ पैकी १५२ जण करोनामुक्त झाले, तर दहा जणांचा मृत्यू झाला.

* वसईत १८ नवे रुग्ण

वसई: वसई विरार शहरात २४ तासात १८ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याने शहरातील एकूण रुग्णसंख्या ३०९ झाली. नव्या रुग्णांमध्ये नाालोसापारा आणि विरारमधील प्रत्येकी ८ रुग्णांचा, तर वसई आणि नायगाव शहरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यापैकी आठजण रुग्णालय कर्मचारी आहेत. करोनाबाधीतांच्या संपर्कात आलेल्या चौघांना संसर्ग झाला असून त्यात १० दिवसांच्या बाळाचाही समावेश आहे. शहरात शनिवारी ११ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १६० झाली आहे. सध्या शहरात १३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.