अस्वच्छ व अर्धकच्च्या भाज्यांतून जंतुसंसर्ग

बाजारातून आणलेल्या फळभाज्या आणि पालेभाज्या स्वच्छ न करता किंवा अर्धवट उकडल्यामुळे त्यावर राहिलेल्या ‘टी सोलिअम’ या जंतूमुळे आकडी येण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. सुरुवातीला हा आजार डुकरांच्या मांस सेवनामुळे होत असे. त्यामुळे जंतूचा उपद्रव प्रामुख्याने मांसाहारींनाच होत असे. आता मात्र अस्वच्छ आणि अर्धवट शिजलेल्या अन्नामुळे हे प्रमाण शाकाहारी रुग्णांमध्येही वाढले आहे.

पालकांसोबत मॉलमध्ये बुधवारी खरेदी करण्यासाठी गेलेल्या निहार ठकार याला अचानक आकडी आली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने या आजाराची कारणे आणि परिणाम चर्चेत आले आहे. रेल्वेलगतच्या जमिनीवर पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांच्या दर्जाबाबत यापूर्वीही अनेकदा आक्षेप घेण्यात आले आहेत. या भाज्यांमधील जंतूंमुळे आता आकडीसारख्या आजाराचीही भीती वाढली आहे. या भाज्यांवर टी सोलिअम जंतूचे प्रमाण अधिक असते आणि अशा भाज्या न धुता किंवा अर्धवट शिजविल्यामुळे आकडी येण्याचा आजार बळावला आहे. सध्या या रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाज्यांवर असलेला टी सोलिअम नावाचा जंतू पोटात गेल्यावर काही वेळा कोणतीही लक्षणे दिसत नाही व तो पचनयंत्रणेमार्फत निघूनही जातो. मात्र काहीवेळा हा जंतू पोटापासून मेंदूपर्यंत जातो आणि त्यामुळे मेंदूच्या पेशींना सूज आल्यामुळे रुग्णाला आकडी येते. सुरुवातीला हा आजार डुकरांच्या मांस सेवनामुळे होत असे. मात्र आता अस्वच्छ आणि अर्धवट शिजलेल्या अन्नामुळे हे प्रमाण शाकाहारी रुग्णांमध्येही वाढले आहे, असे शीव येथील लोकमान्य टिळक पालिका रुग्णालयातील मेंदूविकार विभागप्रमुख डॉ. आलोख शर्मा यांनी सांगितले.

हे जंतू बऱ्याचदा डोळे, स्नायू, मेंदू किंवा शरीराच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. जेव्हा हे जंतू मेंदूमध्ये जातात तेव्हा याला न्युरोसिस्टीसरकोसिस असे म्हटले जाते. या जंतूंमुळे मेंदूच्या पेशींना सूज येऊन रुग्णाला आकडी येते. आकडी आल्यानंतर डॉक्टर एमआरआय किंवा सिटी स्कॅन करून आणि यासाठी उपचार सुरू केले जाते. मात्र या जंतूचा नाश झाल्यानंतर त्या जागी कॅल्शिअमची गाठ तयार होते. ही गाठ औषधांनी कमी करणे शक्य नसल्यामुळे बऱ्याचदा रुग्णामध्ये आकडी येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे बऱ्याचदा शस्त्रक्रिया करून ही कॅल्शिअमची गाठ काढावी लागते. टी सोलिअम जंतू खूप जास्त प्रमाणात मेंदूमध्ये शिरल्यानंतर मात्र जंतूंना मारणे अशक्य असते. या वेळी मेंदूच्या आतील भागाला सूज येऊन रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी फक्त औषधांचे प्रमाण वाढवून यावर नियंत्रण आणले जाऊ शकते, असे केईम रुग्णालयाच्या मेंदू विकार विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

परिणाम

आंधळेपणा, सतत आकडी येणे, मेंदूच्या पेशींना सूज येणे, मेंदूसंसर्ग, डोके दुखणे, अवयव काम न करणे.

घ्यावयाची खबरदारी

  • पालेभाज्या आणि फळभाज्या धुतल्याशिवाय खाऊ नये. त्याचबरोबर डुकराच्या मांसमध्ये टी सोलिअम नावाचे जंतू जास्त प्रमाणात आढळतात त्यामुळे हे मांस खाणे शक्यतो टाळावे. अर्धवट शिजलेल्या मांसातून या जंतूंचा संसर्ग होऊ शकतो. अन्न शिजवल्यामुळे या जंतूंचा नायनाट होतो. त्यामुळे भाज्या धुताना आणि शिजविताना काळजी घ्यावी.
  • सर्वानी सहा महिन्यांतून किमान एकदा पोटातील जंतू मारण्याचे औषध घ्यावे, त्यामुळे धोका कमी होण्यास मदत होते.