17 January 2021

News Flash

वैद्यकीय अभ्यासक्रमात ‘साथरोग व्यवस्थापन’

‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’चा निर्णय

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य

आरोग्यापासून अर्थव्यवस्थेपर्यंत सर्वच क्षेत्रांत करोनाचे विपरीत परिणाम झाले असून ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने याची दखल घेऊन ‘एमबीबीएस’च्या वैद्यकीय अभ्यासक्रमात ‘साथरोग व्यवस्थापन’ (पॅण्डेमिक मॅनेजमेंट) या विषयाचा समावेश केला आहे. ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’चे (एमसीआय) अध्यक्ष डॉ. विनोद कुमार पॉल यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला.

जगभरातील बहुतेक देश आजही करोनाचा सामना कसा करायचा, या प्रश्नात अडकले आहेत. गेले सहा महिने भारतातही करोनाला रोखताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे.  एकीकडे करोनाचे रुग्ण व मृत्यूचे आकडे वाढत आहेत, तर दुसरीकडे अजूनही टाळेबंदी, मुखपट्टी, अंतरनियमांवरून टीका-टिप्पणी सुरू आहे. ‘एमसीआय’ तसेच त्यांचे नियामक मंडळ आणि निती आयोगाने वैद्यकीय अभ्यासक्रमात ‘पॅण्डेमिक मॅनेजमेंट’ या विषयाचा समावेश असावा, अशी भूमिका घेतली. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने गेले दीड महिना अभ्यास करून ‘साथरोग व्यवस्थापन’ विषयाची मांडणी केली असून ‘एमसीआय’ने या नवीन विषयाचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समावेश केला  आहे.

या समितीत डॉ. कृष्णा शेषाद्री, डॉ. आर. कुमार, डॉ. प्रवीण सिंग, डॉ. पी. व्ही. विजयराघवन, डॉ. पी. व्ही. चेलम, डॉ. तेजिंदर सिंग, डॉ. सुबीर मौलिक व डॉ. एम. राजलक्ष्मी यांचा समावेश होता. या विषयाच्या अभ्यासात जागतिक स्तरावरील साथीच्या रोगाचा इतिहास, आजाराचे स्वरूप, रुग्णतपासणी, सामाजिक दृष्टिकोन, कायदेशीर बाबी, आजार व्यवस्थापन, प्रशासकीय बाबी तसेच आरोग्याचे  अर्थशास्त्र साथरोग, तसेच संशोधन, लस विकास आणि शेवटच्या टप्प्यातील रुग्णांवरील उपचार आदीचा समावेश करण्यात आल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.

‘भविष्यातही तयारी गरजेची’

सध्या हा विषय एमबीबीएसच्या पहिल्या वर्षांसाठी असला तरी यापूर्वी इबोला, सार्स, बर्डफ्लू, अशा अनेक साथींचा सामना जागतिक स्तरावर करावा लागला आहे. करोनाचा विचार करता आगामी काळात नवीन साथीचा आजार आल्यास भारतीय डॉक्टर त्याचा सामना करण्यासाठी सर्वार्थाने तयार असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन एमबीबीएसच्या सर्व वर्षांत ‘साथरोग व्यवस्थापन’ हा विषय शिकवला जाणार असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 12:01 am

Web Title: infectious disease management in medical courses abn 97
Next Stories
1 एमयूटीपी-३ प्रकल्पांना आर्थिक बळ
2 केईएम, शीव व नायर रुग्णालयात अजूनही सामान्य रुग्णांची वर्दळ नाही
3 सुशांतने केलं होत गांजाचं सेवन; नीरज सिंहचा मोठा खुलासा
Just Now!
X