तबेल्यांमधील गाई-म्हशींचे मलमूत्र नाल्यातच सोडण्यात येत असल्यामुळे पावसाळ्यात मुंबईत लेप्टोच्या साथीचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळे तबेल्याच्या मालकांवर पालिकेने नोटीस बजावून मलमूत्राची योग्य ती विल्हेवाट लाऊन तबेल्यांमध्ये स्वच्छता राखावी असे आदेश देण्यात आले आहेत. लेप्टोच्या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिका अधिकारी तबेल्यांवर करडी नजर ठेवणार आहेत.

गेल्या वर्षी पावसाळ्यात मुंबई मोठय़ा प्रमाणावर लेप्टोच्या साथीचा प्रादुर्भाव झाला होता. लेप्टोच्या साथीवर नियंत्रण मिळविताना पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रचंड धावपळ करावी लागली होती. मोठय़ा जनावरांच्या मलमूत्रातून लेप्टोचा प्रादुर्भाव झाल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले होते. यंदा पावसाळ्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालिकेने काही उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील १७०० खासगी तबेल्यांच्या मालकांवर नोटीस बजावण्यात आली आहे. तबेल्यांतून नदी-नाल्यांमध्ये सोडण्यात येणारे गाई, म्हशींचे मलमूत्र तात्काळ बंद करावे आणि मलमूत्राची योग्य ती विल्हेवाट लावावी. तसेच तबेल्यांमध्ये स्वच्छता राखावी, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. पालिका अधिकारी तबेल्यांची पाहणी करणार असून नोटीसमध्ये केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले आहे की नाही याची खातरजमा करण्यात येणार आहे. स्वच्छता केली जात नसेल तर तबेल्याच्या मालकांकडून त्यात सुधारणा करून घेतल्या जातील, असे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.