केरळचा तरुण ताब्यात

कॉटन ग्रीन परिसरातील वायुसेनेच्या तळावर गुरुवारी पहाटे घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या केरळच्या तरुणाला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. शिनोज मॅथ्यू (३१) असे या तरुणाचे नाव असून राज्य दहशतवादविरोधी पथकासह स्थानिक पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

मॅथ्यूने मध्यरात्री तीनच्या सुमारास प्रथम वायुसेनेच्या तळावरील मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकावून लावले. त्यानंतर काही वेळाने मॅथ्यूने संरक्षक भिंत ओलांडून तळावर प्रवेश केला. काही मिनिटांनी त्याला तेथील सुरक्षा रक्षकांनी पकडले. ‘मी इथे नवा आहे, काही मंडळी माझ्या मागे लागली, मला मारहाण केली, बचावार्थ मी इथे आलो,’ असे मॅथ्यू बरळू लागला. सुरक्षा रक्षकांनी घेतलेल्या झडतीत त्याच्याकडे आधारकार्ड, पारपत्र आणि शैक्षणिक साहित्य आढळून आले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला काळाचौकी पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

काळाचौकी पोलीस ठाण्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकानेही मॅथ्यूची कसून चौकशी केली. अद्याप त्याला मुक्त करण्यात आलेले नाही. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खातरजमा केल्याशिवाय या तरुणाला मुक्त केले जाणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. काळाचौकी पोलीस ठाण्यातून मॅथ्यूच्या पालकांना संपर्क साधण्यात आला. ते मुंबईत येईपर्यंत मॅथ्यू इथे का आला, त्याच्या मागे खरोखरच काही गुंड, गुन्हेगारी प्रवृत्ती लागल्या होत्या का, आदींबाबत खातरजमा केली जाणार आहे.