फाल्गुन महिना संपून चैत्र महिन्याला सुरुवात होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. परंतु या मंगलदिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी भारतीय अर्थव्यवस्थेचे अनेक निर्देशांक काळवंडलेले दिसून आले. करोनाग्रस्त अर्थव्यवस्थेचा फाल्गुनमास चैत्रातही सुरू राहणार याची ही नांदी होती. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या बेछूट समभाग विक्रीने मुख्य निर्देशांक सेन्सेक्स १,७०८ अंशांनी गडगडला; तर निफ्टी १४,३५० अंशांच्या खाली ओसरला. याच दिवशी महागाई निर्देशांक चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला, तर सलग दुसऱ्या महिन्यात औद्योगिक उत्पादन आक्रसले.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीबाबत विविध वित्तीय संस्थांनी आशावाद व्यक्त केला असला, तरी करोनाच्या दुसऱ्या लाटेचा विपरीत परिणाम त्यावर होईल का, याविषयी चर्चा नव्याने सुरू झाली आहे.

विषाणूजन्य साथीची दुसरी लाट अपेक्षेपेक्षा अधिक घातक ठरत असून, अंशत: टाळेबंदीसदृश निर्बंध लागू झाल्याने अर्थव्यवस्थेच्या फेरउभारीबाबत नव्याने अंदाज बांधणे साशंक ठरत आहे. तर परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्यात अविरत सुरू असलेल्या पडझडीने भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांवरही नकारात्मक प्रभाव पाडला.

वाढत्या अन्नधान्याच्या किमती तसेच इंधनाचे दर यामुळे यंदाच्या मार्चमध्ये महागाई दर ५.५२ टक्क्यांपुढे गेला आहे. यंदा अन्नधान्याच्या किमतीचा निर्देशांक ४.९४ टक्क्यांवर तर इंधन व ऊर्जा गटातील वस्तूंच्या किमती ४.५० टक्के झाल्या आहेत. निर्मिती, खनिकर्मसारख्या क्षेत्रातील सुमार कामगिरीमुळे यंदाच्या फेब्रुवारीमधील औद्योगिक उत्पादन दर -३.६ टक्के नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वी तो सकारात्मक ५ टक्क्यांपुढे होता.

धास्ती आणि चिंता

देशातील करोनाबाधितांची संख्या सोमवारी ब्राझीलच्या रुग्णसंख्येपेक्षाही पुढे सरकली. करोनाग्रस्त अर्थव्यवस्थेचे काय होणार याची धास्ती शेअर बाजारात दिसून आलीच. शिवाय देशाच्या कारखानदारीची परिस्थिती दर्शविणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि किरकोळ महागाई दर अशा सायंकाळी उशिराने जाहीर होत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आकडेवारीसंबंधाने बाजारात गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून आली. परिणामी एकट्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती ८.७७ लाख कोटी रुपयांनी रोडावली.

विकासात विषमता : सुब्बाराव

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास इंग्रजी ‘व्ही’ नव्हे तर ‘के’ आद्याक्षराप्रमाणे होईल. या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता दिसून येईल, असा इशारा रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव यांनी दिला आहे. एका इंग्रजी अर्थविषयक दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सुब्बाराव यांनी सांगितले, ‘करोना महासाथीचा मोठा दुष्परिणाम म्हणजे आर्थिक बाबतीत मोठी विषमता दिसून येईल. हा केवळ नैतिक मुद्दा नाही. भविष्यात ही विषमता आपल्या अर्थव्यवस्थेलाही ग्रासू शकेल. कारण विषमतेचा थेट परिणाम ग्राहक उपभोगक्षमतेवर होईल.’ सार्वजनिक कर्ज वाढेल या भीतीने आर्थिक मदत करता येत नाही आणि चलनवाढ होईल या भीतीने व्याज दरही घटवता येत नाहीत अशा कात्रीत सरकार आणि रिझव्र्ह बँक सापडले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पण भारतासारख्या देशात अशी अवस्था विध्वंसक ठरते. कारण एका वर्गाचे उत्पन्न सुरक्षित आणि संपत्ती वाढत आहे, तर दुसऱ्या वर्गात रोजगार बुडाल्यामुळे उत्पन्न, बचत आणि क्रयशक्ती नष्ट झाल्याचे सुब्बाराव यांनी सांगितले.