इंधनाचे दररोज वाढत आहेत त्यामुळे महागाई वाढते आहे. याचे उत्तर मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्यंगचित्र ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले आहेत. आपल्या देशात महागाई बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढते आहे तर मग ५६ इंच छातीचा दावा करणारे काय करत आहेत? असा प्रश्न या ट्विटमध्ये विचारण्यात आला आहे. ‘५६ इंचवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ असा मथळा देऊन राष्ट्रवादीने महागाईसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. सामान्य माणसाला वाढत्या महागाईचा फटका बसतो आहे. अशावेळी सरकार गप्प का बसले आहे? सामान्य माणसांच्या प्रश्नाबाबत सरकारला घेणे देणे नाही का? अशा आशयाचे हे ट्विट करण्यात आले आहे.

या व्यंगचित्रात वेगाने जाणारी बुलेट ट्रेन दाखवण्यात आली आहे. त्यानंतर एक आलेख दाखवण्यात आला आहे ज्यावर INFLATION अशी अक्षरे आहेत. INFLATI ही अक्षरं हिरव्या रंगात आहेत. तर शेवटची ON ही अक्षरं गडद लाल रंगात दाखवण्यात आली आहेत. महागाई कशी वाढत गेली ते अधोरेखित करण्यात आलं आहे.

काँग्रेसने ५ सप्टेंबरला भारत बंद करून महागाईविरोधात सरकारविरोधात निषेध नोंदवला होता. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. त्यानंतर ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सरकारविरोधात ट्विट करून निषेध करत आहेत. #जवाबदो  ही देखील राष्ट्रवदी काँग्रेसने चालवलेली अशीच मोहिम आहे.