विक्रेत्यांचे आज ई-धरणे; फ्लिपकार्टवरील उत्पादने पाच टक्क्यांनी महागणार

सर्वत्र महागाईच्या झळा बसत असताना ई-संकेतस्थळांवर सवलतीचा दिलासा मिळत आहे. मात्र पाच टक्क्यांपासून ते ८० टक्क्यांपर्यंत सवलत देऊ करणाऱ्या फ्लिपकार्ट या ई-संकेतस्थळ कंपनीच्या धोरणांचा निषेध म्हणून मंगळवारपासून संकेतस्थळावरील विक्रेते उत्पादनांच्या किमतीत पाच टक्क्यांनी वाढ करणार आहेत. यामुळे स्वस्त संकेतस्थळांवरही महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. सोमवारी दिवसभर देशभरातील सुमारे १५००हून अधिक विक्रेते उत्पादने ‘आऊट ऑफ स्टॉक’ दाखवून कंपनीच्या धोरणांविरोधात ई-धरणे आंदोलन करणार आहेत.

फ्लिपकार्ट या संकेतस्थळाने ‘प्रश्न न विचारता परतावा’ हे धोरण आणले आहे. यानुसार एखाद्या ग्राहकाला वस्तू परत करावयाची असेल तर विक्रेत्यांनी त्यांना कोणताही प्रश्न न विचारता वस्तू परत घ्यायची आहे. या धोरणामुळे विक्रेत्यांना ४० टक्क्यांचा फटका बसत असल्याचे ई-सेलर सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय ठाकूर यांनी स्पष्ट केले. विक्रेत्याने कंपनीच्या संकेतस्थळावरून ५०० रुपयांचे उत्पादन विकले तर त्यापैकी त्याला २४६ रुपये मिळतात. पण या नव्या धोरणानुसार विक्रेत्याला केवळ २०५ रुपयेच मिळतात. मोठय़ा किमतीच्या उत्पादनांमध्ये हे नुकसान १५०० ते २००० रुपयांमध्ये असते, असेही ते म्हणाले. यामुळे कंपनीने हे धोरण मागे घ्यावे नाही तर नाइलाजाने विक्रेत्यांना कंपन्यांची साथ सोडावी लागेल, असा इशाराही ठाकूर यांनी दिला.

मुबलक सवलत देऊन ग्राहकांना आपल्या जाळय़ात अडकवून घेत असताना अनेकदा विक्री किमतीत फुगवटा केला जातो. यातून विक्रेता आणि कंपनी आपला नफा कमवीत असतात. आता जर कंपनीने संघटनेची मागणी मान्य केली नाही तर उत्पादनांच्या किमती पाच टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आला आहे.

असे झाल्यास काही उत्पादनांच्या किमती अधिकतम विक्री मूल्यापेक्षा जास्त होणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना ठाकूर म्हणाले की, अनेक उत्पादनांच्या किमती यापूर्वीच अधिकतम मूल्यापेक्षा जास्त दाखविल्या जातात, मात्र सवलतीत विकताना ते त्या किमतीपेक्षा कमी किमतीत विकले जाते. पण जर कंपनीने धोरण मागे घेतले नाही तर अनेक उत्पादने अधिकतम मूल्यापेक्षा जास्त किमतीत विकल्या जाऊ शकतात.

ग्राहकांना अन्य पर्याय

संकेतस्थळावर जर विक्रेतेच नसतील तर ग्राहक तरी कोठून येणार? आम्हाला कंपनीशी असलेले नाते तोडायचे नाही. मात्र कंपनीने जर हे धोरण आणि शुल्कवाढ मागे घेतली नाही तर आम्हाला नाइलाजाने कंपनीशी नाते तोडावे लागेल. मग आम्ही इतर संकेतस्थळांवर आमची उत्पादने विकू. ग्राहकांना सवलतीशी घेणे-देणे असते, संकेतस्थळाशी नव्हे, असेही ठाकूर यांनी नमूद केले.

अ‍ॅमेझॉनचा पाठिंबा

सध्याच्या ऑनलाइन विश्वात अनेक कंपन्यांनी आपल्या धोरणांमध्ये बदल केला आहे. मात्र विक्रेत्यांच्या मागणीनंतर अ‍ॅमेझॉनने त्यांच्या कमिशनच्या दरात कपात करत विक्रेत्यांचा फायदा करून दिला आहे.

निधीची कमतरता असल्यामुळे निर्णय

फ्लिपकार्टला निधीची चणचण जाणवत असल्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते वेगवेगळय़ा क्लृप्त्या लढवितात. मात्र त्याचा फटका या ना त्या प्रकारे विक्रेत्यांना बसत असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला. या संदर्भात फ्लिपकार्टशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

विक्रेत्यांना धोरणाचा फटका

एखादे उत्पादन परत का आले, याचा जाब विचारायचा नसल्यामुळे अनेकदा ग्राहक एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी कपडय़ांची खरेदी करतात. दिवसभर नवीन कपडे घालून कार्यक्रम संपल्यावर ते परत पाठवून देत असल्याचे प्रकार समोर आल्याचेही ठाकूर म्हणाले.