शैलजा तिवले

करोनाच्या संसर्गापासून रक्षण करण्यासाठी वाफ, गरम पाण्याचे, विविध प्रकारच्या काढय़ांचे सेवन आदीच्या प्रचारानंतर आता नाक आणि तोंडामध्ये फवाऱ्यांद्वारे सेवन करता येणारी औषधे बाजारात दाखल झाली आहेत. संसर्ग प्रतिबंधासह रोगप्रतिकारशक्तीही या फवाऱ्यांनी वाढेल, असा दावा करण्यात येत आहे. पण यात तथ्य नसून नागरिकांनी अशा दाव्यांना बळी पडू नये, असा सावधगिरीचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

करोनाचा प्रसार प्रामुख्याने नाक आणि तोंडाद्वारे होऊन शरीरात फुप्फुसांपर्यंत होतो. शरीरात यांचा शिरकाव होण्याआधीच प्रतिबंध करण्यासाठी नाकात औषधी फवारे मारावेत. या औषधांमुळे नैसर्गिकरीत्या विषाणूंना अटकाव केला जाईल, असा दावादेखील संबंधित कंपन्यांनी केला आहे. जंतूंचा झटपट नाश करण्यासाठी ‘आयुर्वेदिक’ फवारे (स्प्रे) बाजारात आले आहेत. त्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी म्हणूनही विविध जीवनसत्त्वाचा समावेश असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

विषाणूंना फारसे वजन नसल्याने ते अन्य माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. ते जेव्हा शरीरात प्रवेश करतात तेव्हा काही नाक किंवा घशाच्या मागील भागावर स्थिरावले तर काही अन्ननलिकेतून शरीरात जातात. त्यामुळे अशा प्रकारे ‘स्प्रे’ मारल्याने संसर्गापासून रक्षण होईल यात तथ्य नाही. अशी उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी यांच्या चाचण्या झाल्या आहेत का, त्यातील निष्कर्ष काय होते, या बाबी तपासणे आवश्यक आहे, असे कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. प्रदीप उप्पल यांनी सांगितले.

यंत्रांमधूनही जीवनसत्त्व..

करोनाकाळात वातानुकूलित यंत्रणा (एसी)वापरू नये असे सूचित केले जात असल्याने आता कडुलिंब, क जीवनसत्त्व इत्यादीचा वापर केलेल्या ‘फिल्टर’चा वापर केल्याचा दावा करत वातानुकूलित यंत्राची जाहिरात केली जात आहे. तसेच प्रदूषित हवेत करोनाचा धोका अधिक असल्याने हवेतील पीए २.५ हे घातक घटक दूर करत हवा शुद्ध करण्याचेही संबंधित कंपन्यांनी म्हटले आहे. अर्थात या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे तपासावे लागेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आयुर्वेदानुसार, शरीरातील विविध प्रकारचे सात धातू असतात. हे धातू सारत्व म्हणजे श्रेष्ठ होतात तेव्हा रोगप्रतिकारशक्ती वाढते. यातील प्रत्येक धातू सारत्वापर्यंत पोहोचण्यासाठी किमान सात दिवसांचा कालावधी लागतो. शरीरात नैसर्गिकरीत्या ही शक्ती वाढविण्यासाठी किमान ५० दिवस लागतात. या काळात आहार, व्यायाम यांसह अनेक बाबींवर लक्ष देणे आवश्यक असते. त्यामुळे झटपट रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे फायदेशीर नाहीत.

– वैद्य उदय कुलकर्णी

दावा काय?  या फवाऱ्यांत वापरलेले औषध नैसर्गिक असून यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि करोना संसर्गाला अटकाव केला जातो, असा दावा कंपन्यांकडून केला जात आहे. अशा प्रकारचे फवारे वापरण्यास सुलभ असल्यामुळे ग्राहक त्याकडे आकर्षित होत आहेत. त्याशिवाय आरोग्य रक्षणासाठी दक्षता वाढली असल्याने बाजारात नवे जे येते, त्यांना अजमावून पाहण्याकडे कल वाढला आहे.