नववर्ष स्वागतासाठी खासगी पार्टी आयोजित करणाऱ्या आयोजकांना मद्यसाठा कोठून आणला याची आगाऊ माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागणार आहे. मालवणीत झालेल्या दारूकांडानंतर सतर्क झालेल्या उत्पादन शुल्क विभागाने बनावट मद्यसाठय़ाला आळा बसावा, यासाठी जोरदार तयारी केली असून अशा पाटर्य़ावर नजर ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची खास पथकेही तयार केली आहेत.
आयोजकांना परवाना देणे तसेच इतर बाबींसाठी उत्पादन शुल्क विभागाची कार्यालये सुटीच्या दिवशीही उघडी ठेवण्याचे आदेश उत्पादन शुल्क आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.
गेल्या काही दिवसांत अनेक आस्थापनांनी एक दिवसाच्या परवान्यासाठी अर्ज केले आहेत. या अर्जाचा तातडीने निचरा केला जात आहे. मात्र आयोजकांना यंदा मद्यसाठय़ाची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना पार्टीसाठी परवानगी मिळणार आहे. खासगी पाटर्य़ातून मोठय़ा प्रमाणात भेसळयुक्त मद्य उपलब्ध करून जात असते. त्यामुळे यंदा अशा पाटर्य़ातील मद्यसाठय़ाची अचानक तपासणी केली जाणार आहे. याशिवाय सोसायटीमध्ये वा गच्चीवर मद्यपार्टीचे आयोजन करताना परवाना घेतला जात नाही. अशा पाटर्य़ामध्ये बनावट मद्यसाठा वापरला जाण्याची शक्यता असते. त्यांनीही एक दिवसाचा परवाना घ्यावा की, जेणेकरून त्यांना छापा टाकला गेल्यास कुठल्याही फौजदारी स्वरूपाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. अधिकृत मद्यविक्रेत्याकडूनच मद्याची खरेदी करा आणि नववर्षांचे स्वागत करा, असे आवाहनही उत्पादन शुल्क आयुक्तांनी केले आहे.
नववर्ष स्वागतासाठी पार्टी आयोजित करणाऱ्या आयोजकांनी रीतसर एक दिवसाचा परवाना घ्यावा. तसेच या पार्टीसाठी मद्यसाठा कोठून खरेदी केला, याचा तपशील देण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. अशा पाटर्य़ामध्ये गोवा वा दमणमधून आणलेला मद्यसाठा वा काही वेळा बनावट तसेच भेसळयुक्त मद्य वापरले जाण्याची शक्यता असते. अशा भेसळयुक्त मद्यामुळे आरोग्याला अपाय होऊ शकतो वा एखादी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे ते टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.