तृतीयपंथीयांच्या मेळाव्यात नोकरी, व्यवसाय आणि निवृत्ती वेतन योजनांविषयी माहिती

मुंबई : शिक्षण, आरोग्य, नोकरी अशा विविध सामाजिक संस्थांशी चर्चा करणे आणि मुख्य प्रवाहातील गरजूंसाठी काम करणे या दोन मार्गानी तृतीयपंथी समाज प्रतिष्ठित जीवनशैलीकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. अनाम प्रेम परिवाराच्या वतीने गोराईच्या सनबीच रिसॉर्ट येथे शुक्रवारी तृतीयपंथीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात विविध राज्यांतून आलेल्या तृतीयपंथीय प्रतिनिधींनी त्यांच्या राज्यात तृतीयपंथीयांसाठी होत असलेल्या कामाविषयी, त्यांच्यासाठी असलेल्या योजनांविषयी माहिती दिली.

‘छत्तीसगडच्या समाज कल्याण विभागाशी चर्चा करून त्यांना तृतीयपंथीयांच्या समस्या पटवून देण्यात आल्या. त्यातून २०१४ साली तृतीयपंथीय कल्याण बोर्डाची स्थापना करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या दुकानवाटपामध्ये दोन टक्के आरक्षण तृतीयपंथीयांना मिळाले,’ अशी माहिती छत्तीसगडच्या विद्या राजपूत यांनी दिली. कुठे कॉल सेंटरमध्ये तृतीयपंथीयांसाठी विशेष शौचालय उभे राहिले, तर कुठे सरकारी नोक ऱ्यांच्या अर्जामध्ये तृतीयपंथीयांना वेगळी ओळख मिळाली. मात्र तरीही या समाजाचे बरेच प्रश्न आजही निरुत्तर आहेत. ‘तृतीयपंथीयांसाठी सरकारने पेन्शन योजना आणली;  पेन्शन योजनेसाठी पात्र व्हायचे असेल तर देहविक्रीचा धंदा त्वरित सोडावा लागतो. सरकारी योजना बेभरवशाच्या असतात. अशा वेळी तृतीयपंथीयांनी आपला धंदा त्वरित का सोडावा? पेन्शन योजनेची खात्रीशीर अंमलबजावणी झाल्यानंतरच तृतीयपंथीय देहविक्रीचा धंदा सोडतील,’ असे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे काम करणाऱ्या मीरा संघमित्रा म्हणाल्या.  पोलिसांकडूनही हीन वागणूक मिळते याबाबत त्यांनी जनहित याचिकाही दाखल केली आहे. महाराष्ट्राच्या प्रिया पाटील यांनी पोलीस यंत्रणेशी वारंवार चर्चा करून त्यांचा दृष्टिकोन बदलला. आता त्यांच्या सहकारी पोलिसांसोबत मोहल्ला कमिटीमध्ये सहभागी होऊन जनजागृतीचे काम करत आहेत. ‘जोपर्यंत आपण मुख्य प्रवाहासाठी काम करत नाही तोपर्यंत मुख्य प्रवाह आपल्याला स्वीकारणार नाही,’ असे प्रिया पाटील यांना वाटते.  त्यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन पालघरच्या गावांमध्ये शौचालयाचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले. ‘बाळाच्या जन्माच्या वेळी शुभेच्छा द्यायला जाणाऱ्या तृतीयपंथीयांसोबत लसीकरणाचा तक्ता दिला जातो. कोणत्या वयात बाळाला कोणती लस देणे आवश्यक आहे याविषयी ते जागरूकता निर्माण करतात,’ अशी माहिती गुजरातच्या अंकुरा यांनी दिली. पश्चिम बंगालच्या अरिंद्राम साही या ‘सपनों की उडान’ नावाची शाळा चालवतात. तिथे दलित मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. ‘‘या माध्यमातून आई बनण्याचे सुख तर अनुभवता येतेच, शिवाय लोक तृतीयपंथीयांसोबत काम करण्यासाठी पुढे येतात,’’ असा अनुभव साही यांनी सांगितला. झारखंडमध्ये तृतीयपथीयांमार्फत जीवनदान योजनेअंतर्गत एचआयव्हीग्रस्त, वृद्ध, अपंग यांना मोफत औषधपुरवठा केला जातो.