22 April 2019

News Flash

मेट्रो-३ची माहिती आकाशवाणीवर

मुंबईच्या भूगर्भातून जाणाऱ्या मेट्रो-३च्या मार्गिकेचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दर आठवडय़ाला कामाचा आढावा

मुंबईच्या भूगर्भात सुरू असलेल्या मेट्रो-३च्या भुयारीकरणाची माहिती आता आकाशवाणीच्या माध्यमातून मुंबईकरांना ऐकता येणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या कामाची प्रगती आणि त्यामध्ये येणारी आव्हाने याची माहिती ‘मेट्रो-३’च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे दर आठवडय़ाला श्रोत्यांना सांगणार आहेत. आकाशवाणीवरील ‘एफएम गोल्ड’ आणि ‘एफएम रेनबो’ या वाहिनीवर या कार्यक्रमाचे प्रसारण ६ सप्टेंबरपासून आठवडय़ातील दोन दिवस होणार आहे.

मुंबईच्या भूगर्भातून जाणाऱ्या मेट्रो-३च्या मार्गिकेचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. आजवर ७.५ किलोमीटरचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. या महिन्यामध्येच मरोळ येथील भुयारीकरण प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. मेट्रो-३ मार्गिकेसंबंधी कामांची माहिती मुंबईकरांना देण्यासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उज्ज्वल भविष्यासाठी मुंबई मेट्रो-३ या हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाणार आहे. कार्यक्रमात निवेदिका उत्तरा मोने या मेट्रो-३च्या संचालिका अश्विनी भिडे यांना मेट्रो-३च्या कामासंबंधी बोलते करणार आहे.

आठवडय़ाचे दोन दिवस हा कार्यक्रम मुंबईकरांना ऐकता येणार आहे. एफएम गोल्डवर वाहिनीवर मंगळवार आणि गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता आणि एफएम रेनबो वाहिनीवर बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ७.१५ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

First Published on September 6, 2018 4:24 am

Web Title: information about metro iii on air