20 July 2019

News Flash

महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी नकोशी

सार्वजनिक आणि सांस्कृतिक ठिकाणी हिंदूी आणि इंग्रजीचेच वर्चस्व

सार्वजनिक आणि सांस्कृतिक ठिकाणी हिंदूी आणि इंग्रजीचेच वर्चस्व

नमिता धुरी, मुंबई

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतच राज्यभाषा मराठीला हिंदी आणि इंग्रजीकडून दिवसेंदिवस वाढती दडपशाही सोसावी लागत आहे. ‘मराठी’ नावाची एखादी भाषा अस्तित्वात आहे आणि त्रिभाषा सूत्रात तिचा समावेश होतो याचाच विसर जणू या महानगरीला पडू लागला आहे. नेहरू विज्ञान केंद्र येथे नुकत्याच सुरू झालेल्या ‘विज्ञान समागम’ प्रदर्शनातही याचाच प्रत्यय येत आहे.

प्रामुख्याने लहान मुले आणि तरुण यांच्यात विज्ञानाबाबत जिज्ञासा जागृत करणे हा ‘विज्ञान समागम’ प्रदर्शनामागचा उद्देश. मात्र मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी हे प्रदर्शन पाहायला येऊ शकतात याचा विचारच करण्यात आलेला नाही. म्हणूनच येथील एकही माहितीफलक मराठीत नाही. हिंदी आणि इंग्रजीत मात्र संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

प्रदर्शनातील सर्व प्रकल्पांची माहिती इंग्रजी-हिंदीतून असल्याने ती समजत नसल्याचे वेदांत वराडकर या अंधेरीहून आलेल्या आणि मराठी माध्यमाच्या शाळेत सातवीत शिकत असलेल्या मुलाने सांगितले. त्याच्या वडिलांच्या विनंतीवरून तेथील स्वयंसेवकांनी प्रकल्पाची माहिती मराठीतून सांगितली खरी, पण प्रदर्शनातील सर्वच स्वयंसेवकांना मराठी येतच होते असे नाही.

‘अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान-तंत्रज्ञान विभाग हे केंद्र  सरकारच्या अखत्यारीत येतात. ‘विज्ञान समागम’ हे प्रदर्शन देशभर फिरणार असल्याने संपूर्ण माहिती प्रादेशिक भाषेत न देता हिंदूी-इंग्रजीत द्यावी, असे निर्देश आहेत. शिवाय या प्रदर्शनातील प्रकल्पांमध्ये इतर देशांतील शास्त्रज्ञांचा सहभाग असल्यामुळे इंग्रजीचाही समावेश करण्यात आला आहे,’ असे स्पष्टीकरण केंद्रीय अणुऊर्जा विभागाकडून देण्यात आले.

गेल्याच महिन्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त बालसंग्रहालय उभारण्यात आले. खरे तर मूळ संग्रहालयातील सर्व माहितीफलक मराठी आणि इंग्रजीतून आहेत. पण बालसंग्रहालयातील सर्व फलकांवर विद्यार्थ्यांनी लिहिलेले त्यांचे अनुभव हिंदी आणि इंग्रजीतून आहेत. तेथील वस्तूंच्या समोर ठेवलेल्या वहीच्या मुखपृष्ठावर हिंदी-इंग्रजीतून वस्तूचे नाव लिहिले आहे. वहीच्या पहिल्या पानावर इंग्रजीतून, दुसऱ्या पानावर हिंदीतून आणि अगदी शेवटी मराठीतून वस्तूचे वर्णन आहे. म्हणजे एक तर मराठीला स्थान द्यायचे नाही आणि दिलेच तर ते उपकार केल्यासारखे, अशी पद्धत दिसते.

जानेवारी महिन्यात गोपाळराव देशमुख मार्ग येथे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन झाले. ललित कला केंद्राचे राष्ट्रीय कलाप्रदर्शन या वर्षी मुंबईतील सर ज. जी. कला महाविद्यालयाच्या आवारात पार पडले. ललित कला केंद्राच्या अध्यक्षस्थानी उत्तम पाचारणे यांच्यासारखी मराठी भाषिक व्यक्ती असणे ही खरे तर मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट. मात्र पाचारणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात एकही मराठी शब्द उच्चारला गेला नाही. इतर बऱ्याच सार्वजनिक ठिकाणीही मुंबईकरांना हाच अनुभव येतो. कारण मराठी माणूस स्वत:च आपल्या भाषेबाबत आग्रही नाही.

दरम्यान, दुकानांच्या पाटय़ा मराठीत व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले होते. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मराठी पाटय़ा लागल्या. मात्र सार्वजनिक ठिकाणी लागणाऱ्या माहिती फलकांवर मराठीला अद्याप हवे तसे स्थान मिळालेले नाही. याबाबत आम्ही आमच्या पद्धतीने नक्कीच काही तरी भूमिका घेऊ, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

रेल्वेत मराठी कधी?

रेल्वे सेवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने येथेही ‘राष्ट्रीय’ नियमाचेच पालन केले जाते. रेल्वेच्या कार्यालयांमध्ये एकही पाटी मराठीत नाही. रेल्वेच्या तिकिटावरील सूचनाही मराठीत नाहीत. ‘रेल्वे मंत्रालयाने ठरवलेल्या नियमांनुसारच सर्व कारभार चालतो. रेल्वे तिकीट छापण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषाच उपलब्ध आहे,’ अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

महापालिकेलाही वावडे

मुंबई महानगरपालिका आणि खासगी कंपन्या यांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकार झालेल्या मरिन ड्राइव्ह येथील क्लीनटेक शौचालयाचे मोठय़ा थाटात उद्घाटन झाले. मात्र या शौचालयातील सर्व सूचना फक्त हिंदी-इंग्रजीतून लावल्या आहेत.

First Published on May 17, 2019 1:21 am

Web Title: information board not in marathi in vigyan samagam exhibition