‘सारेगमप’मधून ‘लिटील चॅम्प’ म्हणून प्रसिद्ध झालेले ‘बालगायक व बालगायिका’ आता तरुण झाले आहेत. संगीताचे पुढील शिक्षण घेऊन अधिक परिपक्व झाले असून त्यांना ऐकण्याची संधी ‘पंचम निषाद’ आणि ‘रंगस्वर’ यांनी रसिक श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आहे. ‘आरोही’ या दोन दिवसांच्या संगीत महोत्सवात मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे यांच्यासह स्वरांगी मराठे, सुरंजन खंडाळकर हे गायक तसेच चिंतामणी वारणकर (तबलावादक), ध्रुव बेदी (सतारवादक) हे तरुण कलाकारही सहभागी होणार आहेत. तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या आरोही संगीत महोत्सवाचे यंदा पंधरावे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व महाराष्ट्र वॉच कंपनी, दादर (पश्चिम) येथे सकाळी ११ ते ६ या वेळेत उपलब्ध.

  • कधी- शुक्र. २० आणि शनि. २१ मे १६
  • कुठे- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे रंगस्वर सभागृह, नरिमन पॉइंट, मंत्रालयासमोर
  • केव्हा- दोन्ही दिवशी सायंकाळी ६.३० वाजता.

अभिवाचनाचा आगळा उपक्रम ‘चला वाचू या’!

लोकांमध्ये उत्तम साहित्याची आवड निर्माण व्हावी, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, वाचन संस्कृतीच्या जतन व संवर्धनाबरोबरच ‘अभिवाचन’ या कलेबाबतची जाण वाढावी या उद्देशाने ‘व्हिजन’ आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला वाचू या’ हा अभिवाचनाचा एक आगळा व स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचन चळवळ उभी राहावी आणि अभिवाचनाचे एक कायमस्वरूपी व्यासपीठ तयार व्हावे हाही या उपक्रमागचा महत्त्वाचा उद्देश आहे. उपक्रमाला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार आहे. आत्तापर्यंत या उपक्रमात अभिनेते व कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र, संगीतकार कौशल इनामदार, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, वृत्तनिवेदक व ज्येष्ठ साहित्यिक अनंत भावे, तसेच राजन ताम्हाणे, शर्वाणी पिल्ले, विजय कदम आणि अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. ‘चला वाचू या’च्या नवव्या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर, अभिनेते शैलेश दातार, औरंगाबाद येथील रंगकर्मी पद्मनाभ फाटक व अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाकरिता रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. ‘व्हिजन’चे संचालक श्रीनिवास नार्वेकर आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

  • कधी- रविवार, २२ मे २०१६
  • कुठे- पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी
  • केव्हा- सायंकाळी ५ वाजता

परेश रावल म्हणतात ‘मै और तुम’!

हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते परेश रावल यांनी बॉलीवूडमध्ये विनोदी, खलनायक किंवा चरित्र अभिनेता म्हणून आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. परेश रावल आता बॉलीवूड सेलिब्रेटी झाले असले तरी ते मुळचे ‘नाटक’वाले आहेत. हिंदी रंगभूमीवरून त्यांचा अभिनय प्रवास सुरू झाला. ते आता बॉलीवूडमध्ये व्यग्र असले तरी नाटकावरील त्यांचे प्रेम कमी झालेले नाही. ते नाटकासाठी आवर्जून वेळ देतात. ‘कृष्णा वर्सेस कन्हय्या’ या नाटकाच्या यशानंतर परेश रावल आता एका नव्या नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे येत आहे. ‘मै और तुम’ असे त्यांच्या नवीन हिंदी नाटकाचे नाव असून याची निर्मिती त्यांच्या पत्नी स्वरूप संपत यांनी केली आहे. विशेष म्हणजे या नाटकात परेश रावल यांची दुहेरी भूमिका आहे.

  • कधी- रविवार, २२ मे २०१६
  • कुठे- टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स (एनसीपीए), नरिमन पॉइंट,
  • केव्हा- सायंकाळी ७.०० वाजता

हिंदुस्थानी शास्त्रीय गायन मैफल

कर्नाटक संघाच्या कलाभारती शाखेतर्फे संगीतप्रेमी आणि रसिक श्रोत्यांची रविवारची सकाळ सुरेल केली जाते. कलाभारतीच्या या संगीत मैफलींना रसिक श्रोते आवर्जून आपली हजेरी लावतात. कर्नाटक संघाची कलाभारती शाखा आणि दर रविवारची संगीत मैफल असे समीकरणच तयार झाले आहे. स्वामी शिववल्लभदास यांचे शिष्य स्वामी चैतन्य स्वरूप यांचे शास्त्रीय गायन या वेळच्या मैफलीत होणार आहे. त्यांना श्रीनिवास आचार्य (संवादिनी) व गिरीश नलावडे (तबला) हे संगीतसाथ करणार आहेत.   ’ कधी- रविवार, २२ मे २०१६

  • कुठे- कर्नाटक संघाचे सभागृह, माहीम
  • केव्हा- सकाळी १०.०० वाजता

‘निवडक माधवी कुंटे’ पुस्तकाचे प्रकाशन

ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांच्या निवडक साहित्याचे पुस्तक ‘निवडक माधवी कुंटे’ या नावाने प्रकाशित होणार आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, राज्य विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड, प्रसिद्ध साहित्यिक सुमेध वडावाला रिसबूड यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे. लेखिका व कवयित्री गौरी कुलकर्णी या कथांचे अभिवाचन करणार असून अभिनेत्री निशिगंधा वाड, अनुराधा राजाध्यक्ष, अशोक बेंडखळे, संजय डुबल हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • कधी- शनिवार, २१ मे २०१६
  • कुठे- स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र, विलेपार्ले (पूर्व)
  • केव्हा-सायंकाळी सहा वाजता

आवाहन

‘विकेंड विरंगुळा’साठी त्या आठवडय़ात शुक्रवार ते रविवार या दिवसात होणाऱ्या साहित्यिक, सांस्कृतिक, संगीत आणि मनोरंजन कार्यक्रमांची माहिती shekhar.joshi@expressindia या ई-मेलवर पाठवावी.