महापालिकेकडून गोपनीयतेचे कारण 

मुंबई : मुंबईमधील स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृतदेहांच्या नोंदीची माहिती ‘गोपनीय’ असल्याचे कारण पुढे करीत ती देण्यास मुंबई महापालिकेने नकारघंटा वाजविली आहे. या प्रकाराबद्दल माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांने नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईमध्ये विविध आजारांनी, व्याधींनी, अपघाताने, वृद्धापकाळाने तसेच आकस्मिकपणे मृत्यू झालेल्या नागरिकांची महिनानिहाय, तसेच दफनभूमीत व स्मशानात अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाच्या नोंदींची माहिती मिळावी यासाठी माहितीचा अधिकार कार्यकर्ता शरद यादव यांनी ‘माहितीचा अधिकार कायद्या’अंदर्गत पालिकेच्या पी-उत्तर विभागाकडे अर्ज केला होता. ‘जन्म व मृत्यू नोंदणी कायदा १९६९’मधील कलम १७ (१) व माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ८ (१) (जे)अन्वये गोपनीय आहे. त्यामुळे ही माहिती देता येणार नाही, असे उत्तर पालिका अधिकाऱ्यांनी यादव यांना पाठविले आहे.मुंबईत मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि स्मशानभूमी, दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृतदेहांच्या नोंदीत तफावत असण्याची शक्यता आहे. ही बाब पडताळून पाहण्यासाठी माहिती मागविण्यात आली होती. परंतु गोपनीयतेचे कारण पुढे करीत पालिकेने ही माहिती देण्यास नकार दिला आहे. या संदर्भात पालिका लपवालपवी करीत आहे, असा आरोप यादव यांनी केला आहे.