लोकमान्य टिळक रुग्णालयातील करोना नियंत्रण कक्षाचा उपक्रम

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई: करोनाची बाधा झालेल्या रुग्णाला भेटू दिले जात नसल्याने त्याच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांची होणारी घालमेल लक्षात घेऊन शीव येथील मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या रुग्णालयातील करोना नियंत्रण कक्षाद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांना फोनवरून त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाते. एवढेच नव्हे तर, रुग्णांच्या माहितीचे डिजिटल स्वरूपात जतनही करण्यात येत आहे.

करोनाबाधित रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संसर्ग प्रसाराचा धोका असल्याने नातेवाईकांना रुग्णालयात येऊ दिले जात नाही. डॉक्टरही सेवेत गुंतल्यामुळे त्यांनाही नातेवाईकांना वेळोवेळी ही माहिती देणे शक्य नसते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती कशी आहे याची माहिती नातेवाईकांना मिळत नाही. अशा स्थितीत काळजीमध्ये असलेल्या नातेवाईकांना रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा किंवा काही बिघाड झाल्यास याची माहिती देण्याची सुविधा लो. टिळक रुग्णालयात कार्यरत असलेल्या करोना नियंत्रण कक्षामध्ये ऊ सुरू केली आहे.

सकाळी साडेचार ते नऊ या वेळेत कक्षातील डॉक्टर पीपीईसह करोनाबाधित वॉर्ड, अतिदक्षता विभागात जातात. तेथील रुग्णांच्या प्रकृतीबाबतची माहिती घेऊन ती कक्षातील प्रणालीमध्ये भरली जाते. रुग्णालयात सुमारे ५०० रुग्ण दाखल असून सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करणे शक्य नाही. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते किंवा ज्या रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणा लावण्याची गरज आहे, काही रुग्ण कृत्रिम श्वसन यंत्रणेवरून बाहेर आलेले असतात, अशा रीतीने रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय बदल असल्यास त्या नातेवाईकांना कळविले जाते, असे या कक्षाची जबाबदारी सांभाळणारे स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. राहुल मयेकर यांनी सांगितले.

गूगलशीटचा वापर करत कक्षामध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात जतन केली जाते आहे.  डिजिटल स्वरूपात माहिती असल्याने करोनाबधित रुग्णांची वॉर्डनिहाय, दाखल झालेले, घरी सोडलेले अशी इत्थंभूत माहिती काही मिनिटांत देणे सोपे झाले आहे, असे डॉ. मयेकर यांनी स्पष्ट केले.

करोनामुक्त रुग्णाचाही पाठपुरावा

जूनपासून करोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णाचाही घरी सोडल्यानंतर दहा दिवसांनी फोनच्या माध्यमातून पाठपुरावा या कक्षामधून केला जात असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. दर दिवशी जवळपास ३० ते ४० रुग्णांना फोन करून त्यांच्या तब्येतीचा आढावा घेतला जातो. आत्तापर्यंत सुमारे ८०० रुग्णांचा पाठपुरावा केलेला आहे.