05 April 2020

News Flash

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे बांधकामाला चालना

विकासामुळे महानगर प्रदेशात १२.६३ दशलक्ष चौरस मीटर इतके बांधकाम नव्याने उपलब्ध होणार आहे.

मुंबईत १२.६३ दशलक्ष चौरस मीटर क्षेत्रावर नवी बांधकामे उपलब्ध होण्याचा अंदाज

मुंबई : मेट्रोचे जाळे, रस्ते, पूल आदी वाहतूक व पायाभूत सुविधांच्या विकासामुळे मुंबईतील बांधकाम व्यवसायालाही चालना मिळण्याची शक्यता रिअल इस्टेट सल्लागार नाइट फ्रँक इंडियाने एका पाहणीत व्यक्त केली. या विकासामुळे महानगर प्रदेशात १२.६३ दशलक्ष चौरस मीटर इतके बांधकाम नव्याने उपलब्ध होणार आहे.

‘इंडिया अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर रिपोर्ट २०२० – स्पेशल फोकस ऑन मुंबई ट्रान्स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर विथ की इम्पॅक्ट मार्केट्स’ या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये सध्या १८०० अब्ज रुपये किमतीच्या परिवहन पायाभूत (मेट्रो आणि रस्ते) प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामुळे एमएमआरमध्ये २४६ किलोमीटर (किमी) मेट्रोचे जाळे आणि ६८ किमी रस्ते विस्तारणार आहेत. यातील काही प्रकल्प येत्या तीन वर्षांत कार्यान्वित होतील. त्यामुळे बांधकाम व्यवसायालाही सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.

याचा फायदा गोरेगाव पश्चिम – मालाड पश्चिम, गोरेगाव पूर्व आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील कार्यालयीन बाजारपेठेवर होऊन अनुक्रमे १.११ दशलक्ष चौरस मीटर (१२ दशलक्ष चौरस फूट), ०.९२ दशलक्ष चौरस मीटर (१० दशलक्ष चौरस फूट) आणि ०.६५ दशलक्ष चौरस मीटर (७ दशलक्ष चौरस फूट) जागा अंदाजे उपलब्ध होईल. त्यामुळे येथील कार्यालयीन जागेची क्षमता ५० टक्के वाढणार आहे.

याव्यतिरिक्त १.६७ दशलक्ष चौरस मीटर (१८ दशलक्ष चौरस फूट) निवासी व कार्यालयीन पुरवठा बोरिवलीच्या एफसीआय गोदामांमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नव्या मार्गामुळे अनेक भाग जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असल्याने त्याचा फायदा बांधकाम व्यवसायाला होण्याची शक्यता आहे, तर वडाळा ट्रक टर्मिनसमुळे (डब्ल्यूटीटी) बीकेसी क्षेत्रात सुमारे ४.६ दशलक्ष चौरस मीटर (५० दशलक्ष चौरस फूट) कार्यालय व रहिवासी पुरवठा अपेक्षित आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडमुळे (जेव्हीएलआर) आणि मेट्रोमुळे एसईईपीझेड-पवई पट्टय़ात आणि महाकाली गुंफा मेट्रो स्थानकाजवळील कार्यालयाच्या जागेचा विकास होईल. या ठिकाणी १.८ दशलक्ष चौरस मीटर (२० दशलक्ष चौरस फूट) आणि ०.६५ दशलक्ष चौरस मीटर (०७ दशलक्ष चौरस फूट) कार्यालयीन जागा उपलब्ध होऊ शकते. याव्यतिरिक्त कांजूरमार्गाजवळ १.११ दशलक्ष चौरस मीटर (१२ दशलक्ष चौरस फूट) कार्यालय आणि निवासी बांधकाम उपलब्ध होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 12:14 am

Web Title: infrastructure construction development metro road bridge akp 94
Next Stories
1 ‘रो-रो’च्या वेगात करा मुंबई ते अलिबागचा प्रवास!
2 कळवा स्टेशनजवळ आग, मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत
3 एल्गार परिषद प्रकरण आता एनआयए कोर्टात
Just Now!
X