करोनाकाळात अडचणी दूर करणारा अभिनव उपक्रम

मुंबई : करोनाकाळात गर्भवतींना रुग्णालयात खाटा न मिळणे, नियमित तपासणीत येणाऱ्या अडचणी, संसर्गाची भीती अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे माता आणि मूल या दोघांचाही प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन ‘हौसला’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. या उपक्रमाअंतर्गत गर्भवतींना वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, तपासणी केंद्रांची व्यवस्था, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आदी सुविधा पुरवल्या जात आहेत.

रुग्णालयांचे लक्ष करोनावर केंद्रित असल्याने ठिकठिकाणी गर्भवती महिलांची उपचारादम्यान गैरसोय होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे काही तरुण मंडळींनी गर्भवतींना प्रसूतीपर्यंतच्या काळात आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्याचे ठरवले. या संकल्पनेला ‘हौसला’ नाव देण्यात आले असून राज्यभरातील चार हजारहून अधिक तरुण स्वयंसेवक, डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ जोडले गेले आहेत. टाळेबंदीमुळे अनेक गर्भवतीच्या काही महत्त्वाच्या चाचण्या रखडल्या आहेत तर काही महिलांची प्रसूतीची तारीख जवळ येऊन ठेपल्याने पुढील प्रक्रियेबाबत चिंतीत आहेत. अशा महिलांनी हौसलाशी संपर्क साधला असता त्यांना तत्परतेने मदत केली जाते.

ठिकठिकाणच्या रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलून वैद्यकीय सेवा आणि गरज असल्यास रुग्णवाहिकाही माफक दारात उपलब्ध करून दिली जाते. वेळप्रसंगी ‘हौसला’शी जोडले गेलेले स्त्रीरोगतज्ज्ञ संपर्क साधून त्यांच्या अडचणी दूर करतात. त्याबदल्यात एकही रुपया आकारला जात नाही. २५ एप्रिलला सुरू झालेल्या या उपक्रमाने आतापर्यंत राज्यभरातील ८३ गर्भवतींना सहाय्य केले आहे. सध्या मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, परभणी, यवतमाळ, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील विविध भागांत हौसलाचे कार्य अविरत सुरू आहे.

सामाजिक बांधिलकी

‘गर्भवतींना करोनाकाळात उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्या या उद्देशाने पुण्यातील डॉ. राहुल इंगळे यांनी पुढाकार घेऊन या उपक्रमाची सुरुवात केली. ‘हौसला’शी जोडले गेलेले डॉक्टर, स्वयंसेवक कुणीही एकमेकांना परिचित नसतानाही एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत,’ असे ‘हौसला’चे करण बेटकर यांनी सांगितले. समाजमाध्यमांद्वारे उभारलेल्या या चळवळीला दिवसेंदिवस उदंड प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच मदतीसाठी ९३५६१८६४९१, ७७१५८६१७६३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.