09 July 2020

News Flash

नाटकाच्या प्रयोगाआधी कलाकारांची चौकशी

वादंगानंतर पोलिसांची नाटकाला परवानगी

मुस्लीम आडनाव असल्याकारणाने ‘रोमिओ रविदास ज्युलिएट देवी’ या नाटकातील कलाकाराची ऑगस्ट महिन्यात पोलिसांनी चौकशी करण्याची घटना ताजी असतानाच आता ‘तफ्तीश’ या नाटकाचे दिग्दर्शक आणि कलाकारांची चौकशी केल्याने नाटय़विश्वातून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या चौकशीबाबत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप नाटय़कर्मीकडून केला जात आहे.

अयोध्यावरील निकालाच्या पाश्र्वभूमीवर कबिरा फाऊंडेशन संस्थेच्या ‘तफ्तीश’ या नाटकाचा प्रयोग करायला पोलिसांनी बुधवारी परवानगी नाकारली होती. मात्र त्यावर झालेल्या वादंगानंतर घडलेल्या घडामोडींमुळे पोलिसांनी नाटकाला परवानगी दिली आहे. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता होणारा नाटकाचा नियोजित प्रयोग विनाअडथळा पार पडला.

दोन ते तीन वर्षांपूर्वी सांस्कृतिक मंचच्या संजय खिलारी यांनी ‘तफ्तीश’ या नाटकाचे मराठीत सादरीकरण केले होते. नाटकाकडे सेन्सॉरचे प्रमाणपत्र असून त्याचे १५ प्रयोगही झाले आहे. कबिरा फाऊंडेशनचा ग्रुप ‘तफ्तीश’ या नाटकाचा सराव ओशिवरा पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या कला प्रदर्शनी पार्क येथे मंगळवारी नेहमीप्रमाणे करत होते. या वेळी तेथे साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी नाटकातील काही संवादांवर आक्षेप घेत या चमूला डी. एन. नगर पोलीस ठाण्यात बोलाविले. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा नाटकाचा संघ पोलीस ठाण्यात गेला. त्या दिवशी जवळपास ५ तास पोलिसांनी नाटकाबाबत दिग्दर्शक आणि काही कलाकारांची चौकशी केली. तसेच त्यांनी नाटकाच्या संहितेचे वाचन केले, अशी माहिती कबिरा फाऊंडेशनचे सचिव मोहम्मद खान यांनी दिली.

नाटकाला सेन्सॉर बॉर्डाने दिलेले परवानगी पत्र पोलिसांना दाखवूनही पोलिसांनी चौकशीचा ससेमिरा सुरू ठेवला. तसेच काही सदस्यांच्या घरी जाऊन आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांची पाहणी केली. हे फक्त त्या दिवशीपुरतेच मर्यादित राहिले नाही. पोलिसांनी बुधवारीही सरावादरम्यान ४ वाजता बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी रात्री १० वाजता आम्हाला जाऊ दिले, असे मोहम्मद यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे दोन दिवसांवर आलेल्या नाटकाच्या प्रयोगाचा सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. आम्ही मागील तीन ते चार वर्षांपासून या पार्कमध्ये नियमितपणे सराव करतो. आतापर्यंत असे कधीही घडले नव्हते. तसेच सरावाला कोणीही आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे आताच कोणी आक्षेप घेऊन तक्रार केली असेल असे वाटत नाही, असेही मोहम्मद यांनी सांगितले.

पोलिसांकडून अशा पद्धतीने कलाकारांवर दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत, असे लोकसांस्कृतिक कला मंचचे सुबोध मोरे यांनी सांगितले.

सध्या राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट आणि अयोध्येचा निकाल या घटनांच्या पाश्र्वभूमीवर या नाटकामुळे समाजात तणावपूर्वक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. नाटकाच्या प्रयोगाच्या आधी केलेल्या चौकशीमुळे कलाकार आणि तंत्रज्ञांमध्ये भीती पसरली होती. चौकशीमुळे ‘तफ्तीश’ या नाटकाचे प्रयोग होण्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांना नाटकाच्या कथेविषयी सांगितल्यावर त्यांनी प्रयोगाला परवानगी दिली.

– कबीर शाहीद, नाटकाचे दिग्दर्शक

हे कलाकार पार्कमध्ये सराव करत होते. त्यांच्या आवाजाचा तेथे फिरायला आलेल्या नागरिकांना त्रास झाला. त्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती. त्यामुळे फक्त चौकशी करण्यासाठी या कलाकारांना बोलाविले होते.

– मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त

ऑगस्ट महिन्यात ‘किस्सा कोठी’ या नाटय़संस्थेचे ‘रोमिओ रविदास ज्युलिएट देवी’ या नाटकाचा पुण्यात प्रयोग होता. प्रयोगानंतर नाटकातील कलाकारांची मुस्लीम आडनाव असल्याच्या कारणावरून चौकशी केली होती. यावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तसेच दिल्लीतील जन नाटय़ मंच संस्थेने अंधेरीत येथील स्टुडिओमध्ये ‘तथागत’ या नाटकाचा प्रयोग केला होता. त्या वेळीही पोलिसांनी नाटकादरम्यान कलाकारांची चौकशी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 1:47 am

Web Title: inquire of the artist before the drama experiment abn 97
Next Stories
1 डीएसकेंना त्यांचेच घर भाडय़ाने मिळणे दुरापास्त
2 सरकार आले तरी टिकणे कठीण
3 ‘लोकसत्ता लोकांकिका’चा महाअंतिम सोहळा नसिरुद्दीन शहा यांच्या साक्षीने
Just Now!
X