मुंबई महापालिकेच्या ‘केईएम’ रुग्णालयात प्राणवायू पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने तीन करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

केईएममधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा बिघडल्याने अतिदक्षता विभागातील तीन करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची ग्वाही दिली. याप्रकरणी पालिकेने मात्र ऑक्सिजन पुरवठय़ामध्ये कोणताही बिघाड झाला नव्हता आणि प्राणवायू पुरवठा कमी झाल्याने कोणीही रुग्ण दगावलेला नाही, असे स्पष्टीकरण केले आहे. दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी शनिवारी केईएम रुग्णालयात जाऊन प्रशासनाकडे ऑक्सिजन पुरवठा प्रकरणाविषयी विचारणा केली. ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेत बिघाड झाला त्यादिवशी केईएमध्ये २१ मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्याच्या दोन दिवस आधी आणि नंतर प्रत्येक दिवशी साधारणपणे ९ ते १० मृत्यू झाल्याची नोंद आहे. मग दुर्घटनेच्या दिवशी मृतांचा आकडा का वाढला, असा सवाल सोमैय्या यांनी रुग्णालय प्रशासनाला केला. याबाबत सोमैय्या म्हणाले, १६ मे रोजी केईएममध्ये २२ मृत्यूंची नोंद झाली होती. ही संख्या १०, १२ असे करत २२ पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर मृत्यूचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. परंतु त्यानंतर पुन्हा कधीही इतक्या मृत्यूची नोंद न झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने मान्य केले आहे. एका विशिष्ट विभागात, विशिष्ट वेळेत हे मृत्यू झाल्याचे प्रशासनाने मान्य केले असून याविषयी तपास सुरू असल्याचे रुग्णालय अधिष्ठात्यांनी सांगितले, असे सोमैय्या म्हणाले.

केईएमच्या अतिदक्षता विभागातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी का झाला, याबरोबरच कथित मृत्यू प्रकरणाची चौकशी केली जाईल. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दक्षता घेण्याची सूचना देण्यात येईल.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री