टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने बुधवारी ‘रिपब्लिक’ वृत्त वाहिनीचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी यांची चौकशी केली. काही कागदपत्रे घेऊन त्यांना गुरुवारी पुन्हा चौकशीस हजर राहाण्याची सूचना करण्यात आली.

गेल्या आठवडय़ात ‘रिपब्लिक’ वृत्त वाहिनीने एका अहवालाचा हवाला देत ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनी टीआरपी घोटाळ्यात सहभागी असल्याचे वृत्त प्रदर्शित केले होते. हा अहवाल हंसा रिसर्च ग्रुपचा असल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला होता. मात्र या अहवालाशी आपला काहीही संबंध नसल्याचे हंसा रिसर्च ग्रुपने स्पष्ट केले. हा अहवाल, त्याआधारे दिलेल्या वृत्ताबाबत चौकशी करण्यासाठी दोन संपादकांना चौकशीस बोलावल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या दोन वाहिन्यांच्या मालकांसह एकूण पाच जणांना अटक केली. तर या घोटाळ्यात ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचाही सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला.

टीआरपी मोजण्यासाठी भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च सेंटरने (बीएआरसी) ग्राहकांच्या घरी बॅरोमीटर यंत्रे बसवली आहेत. या यंत्रांआधारे प्रेक्षक कोणत्या वाहिन्या, कोणते कार्यक्र म जास्त पाहतात याची नोंद केली जाते. त्याआधारे टीआरपी ठरतो.