बेकायदेशीररीत्या ‘टीआरपी’ आणि दर्शकांची संख्या वाढविण्यात वाहिन्यांना मदत करणाऱ्या के बल चालकांकडे गुन्हे शाखेने लक्ष वळविले आहे. सोमवारी कोल्हापूर, सांगली, नाशिक येथील चार केबल चालकांची चौकशी करण्यात आली.
केबल चालकांनी डय़ुअल फ्रिक्वेन्सी किंवा अतिरिक्त प्रसारण करून वाहिन्यांचे टीआरपी, दर्शक संख्या वाढवली. त्यासाठी संबंधित वाहिन्यांकडून केबल चालकांना पैसे देण्यात आले. ही बाब गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून पुढे आली. विशेषत: एआरजी आऊटलियर कंपनीचे सहायक उपाध्यक्ष घनश्याम सिंग याचा मोबाइल, लॅपटॉप तपासला असता त्याने अशाप्रकारे टीआरपी, दर्शक संख्या वाढवून घेण्याबाबत वरिष्ठ आणि त्या खालील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे आढळून आले.
सिंग याच्या लॅपटॉपमध्ये राज्यासह देशाच्या विविध भागांतील के ल चालकांची नावे आणि अन्य तपशील सापडले. त्या सर्व केबल चालकांची चौकशी होईल, असा दावा गुन्हे शाखेने केला.
तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एकाच वाहिनीचे दोन स्लॉटद्वारे प्रसारण केल्याबद्दल दूरसंचार नियामक प्राधिकरणाने(ट्राय) संबंधित केबल चालक आणि वाहिन्यांना वेळोवेळी नोटीस बजावली होती. सोमवारी सहा केबल चालकांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी सांगलीतील दोन, कोल्हापूर आणि नाशिक येथील प्रत्येकी एक केबल चालक चौकशीस हजर झाले.
एकच वाहिनी दोन ठिकाणांहून प्रसारीत करण्यासाठी किती पैसे मिळत होते, अशा प्रकारे कोणत्या वाहिन्यांचे अतिरिक्त प्रसारण केले याबाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली.
अंतरिम ऑडिट रिपोर्ट
टीआरपी घोटाळ्यात गुंतलेल्या वाहिन्यांचे आर्थिक गैरव्यवहार जाणून घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून फॉरेन्सिक ऑडीट करून घेण्यात आले. त्याचा अंतरिम अहवाल हाती आल्याचा दावा गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी केला. या अहवालात एक संशयित वाहिनी सुरू होण्यापुर्वीच टीआरपी, संभाव्य दर्शक संख्या सर्वाधिक मोजण्यात आली होती. तसेच या वाहिनीचा दहा रुपयांचा समभाग सुरू होण्यापुर्वीच १२ हजारांहून अधिक किंमतीला विकला गेला. दोन वर्षांपुर्वी एका समभागाची किंमत ३३ हजार इतकी होती. गेल्यावर्षी ती आणखी वाढली. समभागांची किंमत वाढविण्यासाठी वाहिनीचे संचलन करणाऱ्या मुख्य कंपनीनेच हे समभाग ३०० टक्के चढय़ा भावाने खरेदी केल्याचीही माहिती या अहवालातून समोर आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. हा अहवाल पुरवणी आरोपपत्रासोबत न्यायालयात सादर केला जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2020 12:22 am