कारवाई करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी केवळ आयुक्तांची परवानगी बंधनकारक केली असतानाही ग्रॅन्ट रोड येथील जमीनदोस्त करण्यात आलेल्या टोपीवाला लेन म्युनिसिपल शाळेच्या भूखंडावर धार्मिक आयोजन करण्यास पालिकेच्या विभाग कार्यालयासह अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाने परवानगी दिली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’ने गुरुवारी प्रसिद्ध करताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

सार्वजनिक ठिकाणी तसेच उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांवर कार्यक्रमांना परवानगी देण्याचे साहाय्यक आयुक्तांचे अधिकारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यापूर्वीच काढून घेतले आहेत. असे असतानाही ग्रँट रोड येथील टोपीवाला लेनमधील शाळेचा भूखंड व त्यालगतच्या मैदानावर एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी परवानगी देण्यात आली. पालिकेचा शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाकडून ही परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देताना ‘डी’ विभाग कार्यालयाला मात्र अंधारातच ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची अजोय मेहता यांनी गंभीर दखल घेतली आहे.

पालिकेची शाळा धोकादायक झाल्यामुळे जमीनदोस्त करण्यात आली आहे. असे असले तरी शाळेचा हा भूखंड कार्यक्रमासाठी नाही. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. तसेच या प्रकरणाची र्सवकष चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे अजोय मेहता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमास परवानगी देण्याचे साहाय्यक आयुक्तांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी कशी देण्यात आली? या प्रकरणी दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

अजोय मेहता, आयुक्त