राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याऐवजी तो बाहेर अगोदरच फुटलेला होता त्यामुळे या प्रकरणाची सर्वंकष व सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला परंतू त्याची माहिती अगोदरच बाहेर पडली. ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिल्यावरही अध्यक्षांनी व सभापतींनी चौकशी करण्याचे काम केलेले नाही, असा आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी केला.

विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्प अगोदरच ट्वीटच्या माध्यमातून बाहेर समजत होता. त्याची जाहिरात जी करण्यात आली ती बाहेर कुणाला तरी सांगून करण्यात आली होती. सभागृहात मांडलेला अर्थसंकल्प फुटण्याचे हे महाराष्ट्रातील पहिले प्रकरण आहे आणि हा अर्थसंकल्प फोडण्याचे काम अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले आहे, हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही, असेही पाटील यावेळी म्हणाले.

अर्थसंकल्प फुटणे हे साधे प्रकरण नाही. मुख्यमंत्री कितीही समजून सांगत असले तरी ते त्यांनी कधी केले आणि याची माहिती कोणाला दिली या सगळ्याची सर्वंकष चौकशी झाली पाहिजे. जे ट्वीट केले जात होते ते सुद्धा वेळेच्या आत लोकांपर्यंत पोहचत होते. विशेष म्हणजे त्यांचे ट्वीट आमच्याकडे घोषणा होण्याअगोदर पोहचत होते. यामध्ये नक्की काही काळंबेरं आहे का? यामध्ये कुणाचा फायदा करुन देण्याचे काम झाले का? याची विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चौकशी करावी, अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.