राजनाथ सिंह यांचा विश्वास; ‘आएनएस खांदेरी’ पाणबुडी दाखल

‘‘आयएनएस खांदेरी ही पाणबुडी नौदलात दाखल झाल्यामुळे नौदलाचे सामथ्र्य वाढले असून गरज पडल्यास शत्रूवर जोरदार हल्ला करण्यास आम्ही समर्थ आहोत,’’ असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी मुंबई येथे व्यक्त केला. मुंबई नौदल गोदीत आयएनएस खांदेरीच्या नौदलात दाखल होण्याच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. शांतता भंग करणाऱ्या पाकिस्तानला त्यांनी या वेळी थेट इशाराच दिला. भारतीय नौदलाचे महत्त्व आणि क्षमता अधोरेखित करताना त्यांनी १९७१ च्या युद्धामध्ये नौदलाने पाकिस्तानला नामोहरम केल्याचा दाखला दिला.

कलवरी श्रेणीतील दुसरी पाणबुडी असणारी आयएनएस खांदेरी शनिवारी नौदलात दाखल झाली. त्याचबरोबर नौदलाच्या सर्वात मोठय़ा सुक्या गोदीचे उद्घाटनदेखील राजनाथ सिंह यांनी केले, तर त्यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्ते माझगाव डॉकमध्ये आयएनएस निलगिरी या युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. कलवरी श्रेणीत कलवरी, खांदेरी, कारंज, वेला, वागिर आणि वागशीर या सहा पाणबुडय़ा आहेत. कारंज आणि वेला या दोन पाणबुडय़ांचे २०१८ मध्ये जलावतरण करण्यात आले असून सध्या त्यांच्या चाचण्या सुरू आहेत, सर्व पाणबुडय़ा २०२३ पर्यंत नौदलात दाखल होतील.

आयएनएस खांदेरीच्या कार्यक्रमावेळी राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘संरक्षण दलाचे सामथ्र्य वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेजारच्या देशांनी शांतता भंग केल्यास नौदल कठोर कारवाई करेल.’’ अरबी समुद्रात आणि हिंदी महासागरात नौदलाने केलेल्या कामगिरीचे त्यांनी या वेळी कौतुक केले. पश्चिम किनारपट्टीवर २६/११ प्रमाणे हल्ला होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे, पण आपले नौदल हा हल्ला मोडून काढण्यास समर्थ आहे, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी या वेळी व्यक्त केला.

स्वदेशात पाणबुडीची बांधणी करणाऱ्या काही मोजक्या देशांत भारताचा समावेश होतो याबद्दल अभिमान असल्याचे ते म्हणाले. काश्मीरबाबतची देशाची पुरोगामी भूमिका आणि तेथे सुरू असलेले आपले प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात मांडत असताना, पाकिस्तानचे प्रमुख मात्र दारोदारी जाऊन व्यंगचित्रकारांना संधी देण्याचे काम करत आहेत, अशी टिप्पणी त्यांनी या वेळी केली.

खांदेरी किल्ला आणि शिवाजी महाराज : राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या खांदेरी या सागरी किल्ल्याचा विशेष उल्लेख केला. शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व ओळखले होते. समुद्रावर वर्चस्व राखण्याचे शिवाजी राजांचे स्वप्नच नौदल साकारत आहे, असे त्यांनी या वेळी नमूद केले. पाणबुडीला कणेरी या माशाच्या प्रजातीवरून खांदेरी (हिंदूीत खंडेरी) नाव देण्यात आले आहे.

नौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी : तब्बल २८१ मीटर लांब, ४५ मीटर रुंद आणि १७ मीटर खोल अशी ही नौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी असून थेट पाण्यातच तिचे बांधकाम करण्यात आले आहे. या गोदीमध्ये एकावेळी तीन जहाजे देखभाल दुरुस्तीसाठी ठेवता येतील, तर देशातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्यदेखील यामध्ये सामावू शकेल. या गोदीच्या बांधकामासाठी तब्बल पाच लाख मेट्रिक टन काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे.

अद्ययावत..

डिझेल-विद्युत प्रकारातील ही अद्ययावत पाणबुडी आहे. पर्मासिन मोटार तंत्राचा वापर केल्यामुळे तिचा आवाजच येणार नसून शत्रूच्या सोनार यंत्रणेला चकवा देणे शक्य होईल. खांदेरीवरून चार पाणतीर (टॉर्पेडो) आणि दोन क्षेपणास्त्रे डागण्याची यंत्रणा आहे. संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित आहे. खांदेरीचे नेतृत्व कॅप्टन दलबीर सिंग करत आहेत. या पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकने केली आहे.