आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीवरील दुर्घटनेतील आणखी एका नौसैनिकाचा मृतदेह शनिवारी हाती लागला. मात्र, या जवानाची ओळख पटू शकली नाही.
या पाणबुडीतील १२ नौसैनिकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. शुक्रवारी पाच नौसैनिकांचे राख झालेले मृतदेह सापडल्यानंतर नौदलाने शोधकार्य अधिक जोमाने सुरू केले होते, मात्र नियंत्रण कक्ष आणि पाणबुडीचा तिसरा कप्पा येथील हानी भयानक असल्याने या शोधकार्यात अडथळे येत आहेत. आता यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था सॅल्वेजची मदत घेण्याचा विचार नौदल करत आहे.
शनिवारी पाणबुडीच्या दुसऱ्या भागात प्रवेश करण्याचा पाणबुडय़ांचा प्रयत्न सफल झाला असला, तरी शोधकार्य पुढे नेण्यात यश आले नाही, अशी माहिती नौदलातील सूत्रांनी दिली.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त ‘आयएनएस सिंधुरक्षक’मधील १८ नौसैनिकांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.