04 March 2021

News Flash

‘आयएनएस विराट’ नौदलाचा निरोप घेणार

विराट भारतीय नौदलात १२ मे १९८७ साली दाखल झाली होती.

'आयएनएस विराट' ही युद्धनौका भारतीय नौदलात १२ मे १९८७ साली दाखल झाली होती.

६ मार्चला युध्दनौकेची समारंभपूर्वक सेवानिवृत्ती

भारतीय नौदलाचा मानबिंदू ठरलेली ‘आयएनएस विराट’ ही विमानवाहू युद्धनौका येत्या ६ मार्चला भारतीय नौदलाचा निरोप घेणार आहे. या निरोपाच्या दिवशी संधिप्रकाशात विराटवरील नौदलाचा ध्वज अखेरचा खाली घेण्यात येईल आणि भारतीय नौदलाची अत्यंत महत्त्वाची युद्धनौका इतिहासाच्या उदरात सामावली जाईल. जवळपास ५७ वर्षे जगातील दोन महत्त्वाच्या नौदलांमध्ये सेवा बजावल्यानंतर ही युद्धनौका निवृत्त होत आहे. ‘आयएनएस विराट’च्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाची नौदालातर्फे सोमवारीपत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली असून हा विशेष कार्यक्रम मुंबईत नौदलाच्या गोदीत पार पडणार आहे.

‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ या आपल्या ब्रीदवाक्याला साजेशी कारकीर्द घडवणारी युद्धनौका म्हणून आयएनएस विराटकडे पाहिले जाते. ‘सेंटॉर’ वर्गातील या विमानवाहून युद्धनौकेचे वैशिष्टय़ म्हणजे या युद्धनौकेने भारतीय नौदलात ३० वर्षे तर इंग्लंडच्या ‘रॉयल नेव्ही’मध्ये २७ वर्षे आपली सेवा बजावली. सर्वाधिक सेवा केल्याने या युद्धनौकेची गिनीज बुकच्या जागतिक विक्रमात नोंददेखील झाली आहे. निरोप समारंभात लष्कराच्या डाक विभागाकडून एक विशेष फलक तसेच एक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.

विराट भारतीय नौदलात १२ मे १९८७ साली दाखल झाली होती. विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाल्याने त्या काळात भारतीय नौदलाच्या सागरी सामरिक ताकदीत वाढ झाली होती. विराटवर हवाई माऱ्याची क्षमता असलेल्या विमानांची तुकडी होती. यात सागरातील ‘पांढरे वाघ’ म्हणून ओळखली गेलेली सी-हॅरिअर ही विमाने, पाणबुडीरोधी सी-किंग एमके ४२ सी ही ‘हार्पून’ म्हणून ओळखली गेलेली विमाने तसेच चेतक हेलीकॉप्टर यांचा समावेश होता. ‘ध्रूव’ आणि रशियन बनावटीची ‘कामोव-३१’ हेलीकॉप्टरनेही विराटवरून उड्डाणे केली आहेत.

  • तीन दशकांत या युद्धनौकेवरील विमानांनी एकूण २२ हजार ६२२ तासांचा प्रवास केला आहे. २ हजार २५२ दिवस ही युद्धनौका या काळात कर्तव्यावर होती.
  • सेवाकाळात विराटने ५ लाख ८८ हजार २८७ सागरी मैलांचा प्रवास केला. तसेच, महत्त्वाची बाब म्हणजे सात वर्षे म्हणजे जवळपास २७ वेळा विराटने पृथ्वी प्रदक्षिणा केली. तसेच, युद्धनौकेचा बॉयलरदेखील गेल्या तीन दशकांत तब्बल ८० हजार ७१५ तासांसाठी चालला आहे.
  • १९८९ साली श्रीलंका येथे भारताने राबविलेल्या शांती मोहिमेत विराटने ‘ऑपरेशन ज्युपिटर’ ही महत्त्वाची कामगिरी बजावली होती. १९९० मध्ये गढवाल रायफल्सच्या जवानांसोबत विराटने एक मोहीम पूर्ण केली होती.
  • भारताच्या संसदेवर हल्ला झाल्यानंतर २००१ व २००२ या काळात ऑपरेशन पराक्रममध्येदेखील आपला सहभाग नोंदवला होता. १९८७ पासून २२ कप्तानांनी या युद्धनौकेचे सुकाणू यशस्वीरीत्या हाताळले असून ४० ध्वजाधिकारी आणि आजवरच्या पाच भारतीय नौदल प्रमुखांनी आयएनएस विराटवर आपली सेवा बजावली आहे. ल्ल ‘रॉयल नेव्ही’मध्ये असताना १३ ब्रिटिश कप्तानांनी या नौदलाची धुरा सांभाळली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 3:09 am

Web Title: ins viraat indian navy
Next Stories
1 आमदाराचा हस्तक्षेप असलेला झोपु प्रकल्प मार्गी?
2 तेव्हा कन्हैयाकुमार, आता गुरमेहर!
3 पुलासाठी लोकांच्या पैशांचा अपव्यय!
Just Now!
X