वांद्रे येथील मॉलला लागलेल्या आगीनंतर करण्यात आलेल्या चौकशीत त्या मॉलमध्ये अनेक सुरक्षाविषयक नियम धाब्यावर बसवल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे पालिका आयुक्तांनी शहरातील सर्व मॉल्सची पाहणी करण्यासाठी पथक स्थापन करून अग्निसुरक्षा यंत्रणा अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत.
मंगळवारी सकाळी वांद्रे येथील केनिलवर्थ या शॉपिंग मॉलला आग लागली होती. या आगीच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नव्हती, अंतर्गत रचनेत बदल करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते, पोटमाळ्यावर बेकायदेशी साठा करण्यात आला होता, तळमजल्यावरील वायुविजन यंत्रणा बंद करण्यात आलेली होती. या आगीच्या पाश्र्वभूमीवर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी बैठक बोलावून शहरातील सर्व मॉलच्या अग्निसुरक्षा व्यवस्था अद्ययावत करण्याचे आदेश दिले. यासाठी एक पाहणी पथक स्थापन केले असून ते शहरातील सर्व मॉल्सची पाहणी करून करणार आहेत.