ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांच्यासह पोलीस हवालदार प्रेमसिंग राजपूत, उदय कोरे आणि सुरेश पाटील या चौघांना ५० हजारांची लाच घेताना बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे ठाणे पोलीस दलात खळबळ माजली असून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेला मोठा धक्का बसला आहे.
वाडा परिसरात तक्रारदार यांची केमिकल कंपनी असून तिथे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने कारवाई केली. या कारवाईत पोलीस हवालदार प्रेमसिंग राजपूत आणि सुरेश पाटील या दोघांनी कंपनीत रॉकेल आणि फिनेलची भेसळ होत असल्याच्या आरोपावरून चारचाकी वाहन आणि दोन मजुरांना ताब्यात घेतले. दरम्यान, वाहन सोडविण्यासाठी आणि मजुरांवरील कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांनी तक्रारदारकडे दोन लाखांची मागणी केली होती. तडजोडअंती ५० हजार देण्याचे ठरले होते. या प्रकरणी तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या पथकाने वागळे युनिट कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.