नालासोपारा घटनेनंतर उपाययोजना; व्यापाऱ्यांसोबतच्या बैठकीत पोलीस आयुक्तांच्या सूचना

वसई: शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज असल्याने पोलिसांनी एक कॅमेरा शहरासाठी ही मोहीम सुरू करत नागरिकांना कॅमेरे लावण्याचे आवाहन केले होते. मात्र पोलिसांच्या त्रासामुळे व्यापारी कॅमेरे लावण्यासाठी सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. सोमवारी झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत पोलीस उपायुक्तांनी शहरासाठी सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्याच्या दिशेने लावण्याची तंबी दिली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारीला प्रतिबंध घालता येतो, शिवाय गुन्हा घडल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठीदेखील मदत होत असते. शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे लावण्याचा पोलिसांना प्रयत्न आहे. यासाठी एक कॅमेरा शहरासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. म्हणजे जर दुकानात एक कॅमेरा लावला तर दुसरा कॅमेरा रस्त्याच्या दिशेने लावायाचा अशी ही संकल्पना आहे.

मात्र अनेक ठिकाणी व्यापारी या योजनेसाठी सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याउलट कॅमेरे रस्त्यावर लावले तर दररोज पोलीस विविध कारणांसाठी कॅमेऱ्याचे चित्रण मागत असतात अशा तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या आहे. शनिवारी नालासोपारा पश्चिमेच्या साक्षी ज्वेलर्सवर दरोडा घालून मालकाची हत्या करण्यात आली. या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे होते, पण दुकानाच्या बाहेर कॅमेरा नव्हता. सोमवारी ज्वेलर्स असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील (गुन्हे) यांनी या व्यापाऱ्यांना या घटनेपासून बोध घेत दुकानाबाहेर रस्त्याच्या दिशेने कॅमेरे बसविण्याची सक्त ताकीद दिली आहे.

शहरात एक हजाराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे

एक कॅमेरा शहरासाठी या मोहिमेअंतर्गत प्रमुख चौकात, नाक्यावर आतापर्यंत १ हजार ३९२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. वसई तालुक्याची सध्याची लोकसंख्या पाहता कॅमेऱ्यांचीही संख्या थोडी कमी आहे. त्यामुळे एका कंपनीने पुढे येऊन पोलिसांच्या सहकार्यासाठी आणखी ३९४ सीसीटीव्ही कॅमेरे दोन आणि तीन झोनमध्ये बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वसई विरार महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या परिसरात परिमंडळ २ मध्ये ८४० आणि परिमंडळ ३ मध्ये ५५२ असे  स्थायी (फिक्स) चारही दिशेने फिरणारे,  एकूण १ हजार ३९२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे सर्व सीसीटीव्ही पूर्ण क्षमतेने सध्या सुरू आहेत. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हे कॅमेरे कार्यरत आहेत. मुख्य नाक्यावर लावण्यात आलेले सीसीटीव्हीचे नियंत्रण जवळच्या आस्थापनेत असून हे सर्व कॅमेऱ्यांची नोंद स्थानिक पोलिसांकडे आहे. काही कॅमेऱ्यांचे नियंत्रण स्थानिक पोलीस ठाणे, चौक्यांमध्ये आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस आयुक्तालयात आता नव्याने ५ पोलीस ठाण्यांची निर्मिती होणार आहे. हे सर्व पाहता आता शहरातील प्रत्येक चौकात गल्लीत आणि रस्त्यावर सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. शहरात नव्याने ३९४ सीसीटीव्ही कॅमेरे सुयोग टेलीमॅटिक्स लिमिटेड ही मोबाइल कंपनी लवकरच बसवणार आहे.