शैलजा तिवले

बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे शेकडो डॉक्टर विलगीकरणात आहेत. अशा परिस्थितीत पुढील दोन महिने शहराला सुमारे पाच हजार डॉक्टरांची आवश्यकता असल्याने नोंदणीकृत डॉक्टरांनी किमान १५ दिवस पालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाने (डीएमईआर) केली आहे. या सूचनेनंतर खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने डीएमईआरचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मंगळवारी ऑनलाइन संवाद साधत कोणत्याही ठिकाणी सेवा न देणाऱ्या डॉक्टरांसाठी ही सूचना असल्याचे स्पष्ट केले.

रुग्णांना सेवा देण्याची विनंती खासगी डॉक्टरांना करूनही अनेक डॉक्टर सेवेत रुजू झालेले नाहीत. मुंबईत डॉक्टरांची मोठय़ा प्रमाणात गरज असल्याने १५ दिवस सेवा देण्याचे आवाहन करत जे रुजू होणार नाहीत त्यांच्यावर  कारवाई करण्याचा इशारा दिल्याने अनेक शंका डॉक्टरांकडून  उपस्थित केल्या गेल्या.

करोना विशेष किंवा करोनाव्यतिरिक्त उपचार देणाऱ्या कोणत्याही रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी या अंतर्गत सेवा देण्याची आवश्यकता नाही. सूचनेत नमूद केलेल्या ईमेलआयडीवर त्यांनी सध्या काम करत असलेले ठिकाण, रुग्णालयाच्या नावासह अन्य माहिती सादर करणे बंधनकारक असेल. जे डॉक्टर अन्य कोठेही सेवा देत नाहीत. त्यांनी या सेवेत रुजू होण्याची सूचना दिलेली आहे. यामधून ५५ वर्षांवरील, गरोदर असलेल्या महिला, एक वर्षांपेक्षा लहान बाळ असलेल्या माता आणि मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थमा, हृद्यविकार इत्यादी आजार असलेल्या डॉक्टरांना यातून सूट देण्यात येईल.

ल्ल सेवा देणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे आवश्यकता असेल तेथे १५ दिवसांसाठी नियुक्त केले जाईल. पालिकेचे बहुतांश डॉक्टर करोनाबाधित रुग्णांवर उपचारांमध्ये व्यस्त असल्याने इतर विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवेत यावे. त्यांना करोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णालयांमध्ये पाठविले जाईल. डॉक्टरांना त्यांच्या सोईस्कर वेळेनुसार मे महिन्यात सेवा देण्याची तसेच घराजवळील ठिकाणी काम करण्याची मुभा असेल, असे डॉ. लहाने यांनी सांगितले.

ल्ल सेवा देणाऱ्या डॉक्टरांना गरज असल्यास १५ दिवस आणि त्यापुढील विलगीकरणाचा काळ अशी २८ दिवस राहण्याची-जेवणाची सोय, पीपीईसह सर्व सुरक्षा साधने आणि विमा संरक्षण लागू केले जाईल. तसेच एखाद्या डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाल्यास संपूर्ण उपचारही मोफत दिले जातील, असे यात डीएईआरने सांगितले आहे.

ल्ल ही सूचना मुंबईत नोंदणी केलेल्या सर्व डॉक्टरांसाठी असून सूचनेत नमूद केलेल्या ईमेलआयडीवर माहिती देणे बंधनकारक आहे. आम्हाला कोणावरही कारवाई करण्याची इच्छा नाही. परंतु याला प्रतिसाद न दिल्यास कारवाई करावी लागेल. कारवाई काय करावी याबाबत अजून निश्चित काही ठरविले नसल्याचे डॉ. लहाने यांनी व्यक्त केले.