करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बुधवारपासून घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्यानंतर पन्नास टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा शिक्षकांना घरातूनच काम करण्याची सूचना देण्यात आली आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकांनी पुढील आदेश येईपर्यंत घरी राहून ऑनलाइन तासिका घ्याव्यात असे आदेश पालिकेने दिले आहेत. घरातून काम करताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामाची गूगल शीट किंवा वर्कशीटमध्ये नोंद करणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्याचे वितरण करण्यासाठी शाळेत शिक्षकांची उपस्थिती आवश्यक असल्यास त्या संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावू नये, असे महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात केले आहे.
रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे घरातूनच काम करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2021 12:44 am