नवोदित कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ट्रस्टची स्थापना

कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणारी अवलिया माणसे कलेची आवड जपण्यासाठी हरतऱ्हेच्या गोष्टी करताना पाहायला मिळतात. अशीच संगीताची आवड जपणारे मुंबईतील हन्सोटी दांपत्य उतारवयात संगीताची सेवा करण्यास सरसावले असून त्यांनी नवोदित वादकांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘इन्स्ट्रमेंटल म्यूझिकल ट्रस्ट’ची स्थापना केली. विशेष बाब म्हणजे हा ट्रस्ट डॉ. रमेश हन्सोटी यांनी त्यांच्या वयाच्या ८९ व्या वर्षी सुरू केला असून त्यांच्या ७८ वर्षीय पत्नी कला हन्सोटी त्यांना या कामात साथ देत आहेत. घाटकोपर येथे राहणारे डॉ. हन्सोटी हे ‘दयरोगतज्ज्ञ’ असून त्यांना पहिल्यापासूनच मराठी संगीताची नितांत आवड आहे. त्यांच्या इतकीच आवड त्यांच्या पत्नीनेही जपली असल्याने संगीत क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा या दांपत्याच्या मनात पहिल्यापासूनच होती. त्यामुळे या दांपत्याने ही आवड संगीत ऐकण्यापुरती मर्यादित न ठेवता आपल्या मिळकतीतून दिग्गज कलावंतांना आर्थिक मदत करण्याचे काम त्यांनी आरंभले. आजवर त्यांनी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांना तब्बल ५० लाखांपर्यंत आर्थिक मदत केली आहे. मात्र, इथवर न थांबता या दांपत्याने कसलेल्या कलावंतांना मदत करण्याबरोबरीनेच नवोदित कलाकारांना साथ देण्याचाही निर्णय घेतला. यात त्यांना विशेषत वाद्य वादनाच्या कलेबाबात विशेष आस्था निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी अशा वादकांना एका छताखाली आणण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. संगीताची आवड जगण्यासाठी व नवोदित कलाकरांना साथ देण्यासाठी आम्ही या ट्रस्टच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून यात आमचे सहकारी नाविद इनामदार आम्हाला महत्त्वपूर्ण सहकार्य करत आहेत, असे कला हन्सोटी यांनी सांगितले.

डॉ. हन्सोटी यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून माटुंगा कल्चरल सेंटर व अजिवासन सभागृह, जूहू येथे सूरसंध्या हे तीन सांगीतिक कार्यक्रम झाले असून या ट्रस्टच्या माध्यमातूनच त्याचा खर्च करण्यात आला. कार्यक्रमात दिलशाद खान यांचे सारंगी वादन, इमरान खान यांचे सतार वादन, तर इटलीच्या लॉरेन्स यांचे गिटार वादन झाले असून या दिग्गजांच्या साथीनेच अमृता लोखंडे हिचे सतार वादन, प्रशांत बनिया या अंध कलावंताचे बासरी वादन, मनीष पिंगळे यांचे मोहन वीणा वादन, अनुब्रत चटर्जीचे तबला वादनही झाले असून हे सारे कलावंत ताज्या दमाचे आहेत.

संगीतावर नितांत श्रद्धा..

भारतीय संगीतावर आमची नितांत श्रद्धा असून या कलेने आमच्या आयुष्यात सदैव आनंद देण्याचे काम केले आहे. त्यामुळे या कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी हा ट्रस्ट स्थापन केला असून आम्ही दोघेही हयात असेपर्यंत दरवर्षी तीन मोठे सांगीतिक कार्यक्रम करणार आहोत. या नवोदितांना संधी देणार असून पुढील काळात एक मोठी रक्कम या ट्रस्टच्या नावे करून त्यातून मिळणाऱ्या व्याजावर हे कार्यक्रम पुढे सुरू राहतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.

– डॉ. रमेश हन्सोटी, ट्रस्टचे संस्थापक