पोलिसांच्या कारवाईनंतर आठवडाभरातच नवा बेकायदा थांबा

स्थानकाजवळच्या रस्त्यावरील अनधिकृत दुकाने जमीनदोस्त झाल्यानंतर व स्थानक परिसरातील रिक्षाचालकांना हटवल्यानंतर वांद्रे पूर्वेकडील परिसर मुक्त झाल्याची दवंडी पिटवण्यात येत असताना, अवघ्या आठवडाभरात या ठिकाणी रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा सुरू झाली आहे. पोलिसांनी बेकायदा तळ हटवल्यानंतर रिक्षाचालकांनी आता वांद्रे पूर्वेकडील ‘बीकेसी’कडे जाणाऱ्या पुलाखाली अनधिकृत थांबा थाटला आहे. त्यामुळे या परिसरात आता पुन्हा कोंडी होऊ लागली आहे.

वांद्रे पूर्वेला दंडाधिकारी न्यायालय, वांद्रे कुर्ला संकुल, रुग्णालये, वांद्रे टर्मिनस, महाविद्यालये असल्याने या स्थानकाजवळ कायम गर्दी असते. मात्र स्थानकाजवळ अनधिकृतपणे तळ ठोकणाऱ्या रिक्षाचालकांमुळे प्रवाशांना चालणेही अवघड होते. यासाठी पालिका व पोलिसांनी मिळून रिक्षाचालकांना समज दिली होती. मात्र आठवडय़ाभरात या मुजोर रिक्षाचालकांनी स्थानकाजवळ गर्दी करावयास सुरुवात केली आहे. टाटा वसाहत, वांद्रे कुर्ला संकुल या भागांत जाणाऱ्या स्थानकाजवळील बस थांब्याजवळच हे रिक्षाचालक प्रवाशांची वाट पाहत उभे असतात. कलानगरहून वांद्रे टर्मिनस, खार स्थानकाला जाणाऱ्या प्रवाशांना स्थानकाजवळील भागात थांबून राहावे लागत आहे. वांद्रे पूर्वेकडून वांद्रे कुर्ला संकुल व टाटा वसाहत येथे शेअर रिक्षा सुटतात. मात्र रिक्षाचालकांमधील चढाओढीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

वांद्रे पूर्वेकडील पूल उतरताच ग्राहक मिळविण्यासाठी रिक्षाचालक मोठमोठय़ाने आरोळ्या ठोकतात. त्यातच बेशिस्तपणे उभ्या असलेल्या रिक्षांमुळे प्रवाशांना चालणेही शक्य होत नाही, असे जान्हवी मटकर या तरुणीने सांगितले. रिक्षाचालक रांगेत उभे राहिले तर प्रवासी मिळविण्यासाठी चालकांमधील वाद होणार नाही आणि प्रवाशांनाही सोईचे जाईल, असे जान्हवी म्हणाली. रिक्षाचालकांच्या अनधिकृत तळाजवळ पोलीस अधिकारी उभे असल्यास रिक्षाचालक रांगेत गाडय़ा लावतात. इतर वेळी मात्र निम्म्यांहून अधिक रस्ता रिक्षांनी भरलेला असतो, असे या परिसरातील सूरज बसवाला यांनी सांगितले.

झोपडपट्टय़ांना सूचना

रविवारी, २३ जुलै रोजी वांद्रे पूर्वेकडील पाइपलाइनजवळील तीन मजल्यांची झोपडी कोसळल्याने दुर्घटना झाली होती. यात दोघे जखमी झाले होते. त्यामुळे पालिकेने बेहरामपाडा, गरीबनगर व पाइपलाइनजवळील झोपडपट्टय़ांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षी गरीबनगर या भागातील झोपडपट्टय़ांमध्ये आग लागणे, झोपडय़ा कोसळणे या घटना घडतात. हे टाळण्यासाठी पालिकेने या झोपडीधारकांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले आहे.