इंद्रायणी नार्वेकर

करोनाबळींच्या अंत्यविधीसाठी विद्युतदाहिन्या अपुऱ्या; सरासरी पाच तासांची प्रतीक्षा

करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने रुग्णालयांत अधिकाधिक खाटांची व्यवस्था करण्यात सरकारी यंत्रणा गुंतलेली असताना मुंबईत वाढत्या करोनाबळींमुळे मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. करोनामुळे मरण पावलेल्यांचे मृतदेह विद्युतदाहिनीतच जाळावे लागत असल्यामुळे ठरावीक स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी अक्षरश: पाच ते सहा तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत असल्यामुळे ताण वाढल्याने चेंबूरच्या चरई आणि शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत काही दिवसांपूर्वी बिघाड झाला होता. विद्युतदाहिनीची सोय असलेल्या ठरावीक स्मशानभूमीत गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा संख्येने मृतदेह रुग्णवाहिकेतून आणले जात आहेत. करोनाबाधिताचा मृतदेह विद्युतदाहिनीतच जाळावा लागत असल्यामुळे ज्या स्मशानभूमीत विद्युतदाहिनी किंवा गॅसदाहिनी आहे अशा ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्याकरिता कमीत कमी दोन-अडीच तास ते पाच-सहा तास लागत आहेत. त्यामुळे ठरावीक स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिका अनेक तास रांगेत उभ्या असल्याचे चित्र दिसते आहे. काही दिवसांपूर्वी बोरिवलीतील एका स्मशानभूमीबाहेर मृतदेह घेऊन आलेल्या रुग्णवाहिकांच्या अक्षरश: रांगा लागल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत होती. शिवाजी पार्क, भोईवाडा, वरळी, चरई, रे रोड, सायन, टागोर नगर, ओशिवरा, डहाणूकर वाडी, बोरिवलीतील दौलत नगर येथील स्मशानभूमीत विद्युतदाहिनीतील अंत्यसंस्कारासाठी असाच वेळ लागत असल्याचे चित्र आहे.