करोनाच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी राज्यात सुमारे १७ लाख ५० हजार कुप्यांची आवश्यकता आहे. परंतु केंद्राने केवळ ९ लाख ८३ हजार कुप्या दिल्या असून. हा साठा अपुरा आहे. पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्याला आणखी ७ लाख ८७ हजार कुप्यांची आवश्यकता असून त्यांचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्य विभागाने केंद्राकडे केली आहे.

राज्यात लसीकरणासाठी सुमारे आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी  झाली आहे. एका व्यक्तीला २८ दिवसांच्या अंतराने लशीच्या दोन मात्रा देणे आवश्यक आहे. तसेच कुप्यांमध्ये काही त्रुटी किंवा अन्य काही अडचणी असण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिरिक्त १० टक्के साठा दिला जातो. यानुसार केंद्राकडून राज्याला १७ लाख ५० हजार कुप्या येणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात ‘कोव्हिशिल्ड’च्या ९ लाख ६३ हजार आणि ‘कोव्हॅक्सीन’च्या २० हजार अशा एकत्रित ९ लाख ८३ हजार कुप्या प्राप्त झाल्या आहेत.

‘हा साठा पुरेसा नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्याची संपूर्ण जबाबदारी केंद्राची आहे. त्यामुळे आणखी कुप्या पुरविण्याची मागणी केंद्रीय आरोग्य विभागाकडे केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि पुढील काही दिवसांत आणखी साठा राज्याला येईल’, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

‘मुंबईत १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून याच्या दुप्पट म्हणजे सुमारे २ लाख ६० हजारांहून अधिक साठा येणे अपेक्षित होते. परंतु पहिल्या टप्प्यात १ लाख ३९ हजार ५०० कुप्या प्राप्त झाल्या आहेत. एका व्यक्तीला एका प्रकारच्या लशीची पहिली मात्रा दिल्यानंतर दुसरी मात्राही त्याच लशीची देणे आवश्यक आहे. तसेच पुढील टप्प्यात येणारी लस याच कंपनीची असेल याची शाश्वती नाही. त्यामुळे नियोजन करतानाच एका व्यक्तीला दोन मात्रा यानुसार लसीकरणाचे सत्र आयोजित करावे लागेल. उपलब्ध लशीमध्ये मुंबईतील १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांपैकी ६० हजार जणांना लसीकरण शक्य आहे. उर्वरित ७० हजारांचे लसीकरण लशींचा साठा आल्यानंतरच करता येईल’, असे पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

शनिवारी राज्यातील ५११ केंद्रांवर लसीकरण सुरू होणार होते. परंतु या केंद्रांची संख्या कमी करण्याची सूचनाही केंद्राने राज्याला दिली आहे. त्यामुळे आता ५११ ऐवजी ३५८ केंद्रांवर शनिवारी लसीकरण केले जाणार आहे. यात सर्वाधिक केंद्रे मुंबईत (५०) असून त्यापाठोपाठ पुणे (३९), ठाणे (२९) या शहरांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुंबईसाठी १ लाख ३९ हजार ५००, तर पुण्यासाठी १ लाख १३ हजार कुप्यांचे वितरण केले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

केंद्राचे म्हणणे..

आवश्यकतेपेक्षा राज्याला कमी कुप्या मिळाल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले असून याला केंद्रीय आरोग्य विभागाने ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सीन’ लशींच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी ६५ हजार  कुप्या खरेदी केल्या असून त्यांचे वाटप सर्व राज्यांना केले असल्याचे यात म्हटले आहे.

उद्घाटन कार्यक्रम मुंबई आणि जालन्यात

जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतील कूपर रुग्णालय या दोन ठिकाणी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणाचा उद्घाटन कार्यक्रम होणार असून पंतप्रधान संवाद साधणार आहेत.