जातीअंताच्या चळवळीचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासकीय व खासगी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले पाहिजे, कोणत्याही कागपत्रांवर त्यांच्या जातीचा उल्लेख करता कामा नये, त्याचबरोबर वारसाहक्क, संपत्तीचा वाद, घटस्फोट अशा विवाहविषयक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी धार्मिक विवाह कायद्याच्या जागी राष्ट्रीय कायदा आणावा, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या एकजुटीतून नव्याने जाती अंताची चळवळ सुरु करण्यात येणार आहे. पुणे येथे २५ जानेवारीला आयोजित केलेल्या परिषदेत त्याची सैद्धांतिक व कृती कार्यक्रमाची मांडणी केली जाणार आहे. जातीअंताच्या चळवळीकडे एका जातीचा प्रश्न म्हणून बघू नये, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रउभारणीशी संबंधित हा विषय आहे, त्यासाठी दीर्घकालीन कृती कार्यक्रमावर भर देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.