राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवासी वाहतूक सेवा देत महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठरलेल्या एसटीची आंतरजिल्हा सेवा आज, गुरुवारपासून पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे ई-पास न काढता एसटीतून मुंबई-पुण्यासह एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात प्रवासाचा मार्ग मोकळा झाला असून, गणेशोत्सवाच्या तोंडावर लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईतून पहिली एसटी गुरुवारी सकाळी ७ वाजता दादर ते पुणे शिवनेरी सुटणार आहे. त्यानंतर याच मार्गावर सकाळी ९ वाजता आणखी एक शिवनेरी धावेल. पुण्यातूनही दादर, ठाणे, बोरिवलीसाठी बससेवा सुरू होईल. मुंबई सेंट्रलमधून चिपळूणसाठी सकाळी ९ वाजता, तर अलिबागसाठी ८.३० वाजता पहिली आणि साडेदहा वाजता दुसरी एसटी सोडण्यात येईल. ठाण्यातील वंदना टॉकीज येथून सकाळी नऊ वाजता एसटी स्वारगेटसाठी रवाना होईल.

एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या बससेवा पूर्वीच्याच तिकीट दरात टप्प्याटप्प्याने सुरू होतील. त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बससाठी आरक्षण करता येईल. एसटीच्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही, असे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. एसटी प्रवासासाठी कमाल २२ प्रवासी, सुरक्षित अंतर आदी करोनासाठीचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या साथीमुळे २३ मार्चपासून मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणणे, कोल्हापूर-सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडताना सुरक्षित सेवा पुरविली. २२ मेपासून जिल्ह्य़ांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. त्याद्वारे दररोज सुमारे १३०० बसमधून सरासरी ७,२८७ फेऱ्यांतून अंदाजे दीड लाख प्रवाशांना एसटीने सेवा पुरविली आहे, अशी माहितीही परब यांनी दिली.

प्रवास सुलभ

आंतरजिल्हा एसटी बससेवेमुळे मुंबईहून पुणे किंवा पुण्याहून मुंबई प्रवास सोपा होणार आहे. त्यासाठी ई-पासची आवश्यकता नाही. मात्र, मुंबईहून पुण्याला खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी ई-पास काढावा लागेल, असे अ‍ॅड. अनिल परब यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाच्या काळात तरी ई-पासचे र्निबध शिथिल करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती; परंतु राज्य सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही.

एसटीच्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही. कमाल २२ प्रवासी आणि अंतरनियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बससंख्या वाढवली जाईल.

– अ‍ॅड. अनिल परब, परिवहनमंत्री