14 December 2019

News Flash

‘इंटरसिटी’चा वेग मंदावणार

थांबा रद्द केल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचीही भेट घेऊन पुन्हा थांबा देण्याची मागणीही केली.

(संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वेकडून ‘पुश-पुल’ इंजिन काढण्याचा निर्णय :- मुंबई ते पुणे वेगवान प्रवासासाठी इंटरसिटी एक्स्प्रेसच्या दोन्ही बाजूला कायमस्वरूपी इंजिन जोडून (पुश अ‍ॅण्ड पुल पद्धतीने) एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने पाच महिन्यांनंतर मागे घेतला आहे. कर्जत स्थानकात रद्द केलेला थांबा, तांत्रिक कारणांमुळे गाडीला पोहोचण्यास लागत असलेला उशीर अशा कारणांमुळे पुश अ‍ॅण्ड पुल पद्धत मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबरपासून जुन्या वेळापत्रकाप्रमाणे इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार आहे. तसेच गाडीला कर्जत स्थानकातही थांबा दिला जाणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

जुन्या वेळापत्रकाप्रमाणे धावताना मुंबई-पुणे प्रवासासाठी इंटरसिटी एक्स्प्रेसला ३ तास १७ मिनिटांचा वेळ लागत होता. हे अंतर कमी करण्यासाठी एक्स्प्रेसच्या दोन्ही बाजूला पुश अ‍ॅण्ड पुल पद्धतीने कायमस्वरूपी इंजिन जोडून गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वेग वाढण्यास मदत होणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार ३१ मे पासून इंटरसिटीच्या वेळापत्रकात बदलही केले. सीएसएमटीवरून ६.४० वाजता सुटणारी एक्स्प्रेस ६.४५ वाजता, तर पुण्याहून सायंकाळी ५.५५ वाजता सुटणारी इंटरसिटी ६.३० वाजता सोडण्यात आली. त्यामुळे सीएसएमटीला ही गाडी रात्री ९.०५ वाजता पोहोचणार होती. या नव्या वेळापत्रकानुसार इंटरसिटी चालवताना कर्जत स्थानकात तांत्रिक कारणांसाठी असलेला थांबा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे येथून गाडी पकडणाऱ्या प्रवाशांनी नाराजीही व्यक्त केली होती.

थांबा रद्द केल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचीही भेट घेऊन पुन्हा थांबा देण्याची मागणीही केली. मात्र वेगवान प्रवासाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या रेल्वेने पुश-पुल चाचणी सुरूच ठेवली. ही चाचणी करताना गाडी वेळेत पोहोचण्याऐवजी तांत्रिक कारणांमुळे उशिरानेच पोहोचत होती. पावसाळ्यात मुंबई-पुणे मार्गावर काही ठिकाणी असलेल्या वेगमर्यादेमुळे या गाडीला पोहोचण्यास अर्धा ते पाऊण तास उशीर होत होता. अखेर मध्य रेल्वेने पुश-पुल पद्धतीने दुहेरी इंजिनचा प्रयोग मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. २१ नोव्हेंबरपासून जुन्याच वेळापत्रकाप्रमाणे इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार आहे.

कर्जत स्थानकात पुन्हा थांबा

इंटरसिटी एक्स्प्रेसला पुन्हा कर्जत स्थानकात थांबा मिळणार आहे. घाट क्षेत्रातून जाताना वेग मिळावा यासाठी पूर्वी पुण्याच्या दिशेने जाताना कर्जत स्थानकात इंटरिसटी एक्स्प्रेसला मागच्या बाजूने आणखी एक इंजिन जोडले जात असे. लोणावळा स्थानकात पुन्हा इंजिन काढले जात होते व त्यानंतर गाडी पुढे रवाना होई. याच पद्धतीने मुंबईच्या दिशेने येताना कर्जत स्थानकापर्यंत असलेले इंजिन काढले जात असे. कर्जत स्थानकात या प्रक्रियेसाठी सात मिनिटांचा थांबा मिळत होता. पुण्याकडे जाताना ही एक्स्प्रेस कल्याण स्थानकातही थांबते. कर्जत येथून कल्याण स्थानकात इंटरसिटी एक्स्प्रेस पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागत होती. ही धावपळ टाळण्यासाठी अनेक प्रवासी कर्जत स्थानकातूनच एक्स्प्रेस पकडत होते. त्यामुळे या प्रवाशांना पुन्हा दिलासा मिळणार आहे.

वेळापत्रकात बदल

 गाडी क्र. १२१२७ सीएसएमटीतून सकाळी ६.४० वाजता सुटेल व पुणे येथे ९.५७ वाजता पोहोचेल.

 गाडी क्र. १२१२८ पुणे येथून सायंकाळी ५.५५ वाजता सुटून सीएसएमटी येथे रात्री ९.०५ वाजता पोहोचेल.

First Published on November 21, 2019 2:44 am

Web Title: intercity will slow down akp 94
Just Now!
X