टाळेबंदीचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने सगळ्याच प्रकरणांतील अंतरिम दिलासा १५ जूनपर्यंत कायम ठेवण्याचे गुरुवारी स्पष्ट केले. याशिवाय तातडीची प्रकरणे ५ मेपर्यंत दुपारी १२ ते २ या वेळेत आणि दूरचित्रसंवाद (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) सुनावणीद्वारे घेण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

टाळेबंदीचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या प्रकरणांमध्ये अंतरिम दिलासा देण्यात आलेला आहे तो १५ जूनपर्यत कायम राहील, असे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील चार न्यायमूर्तींच्या विशेष खंडपीठाने गुरुवारी स्पष्ट केले. ४ मे रोजी स्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश देण्यात येतील, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

याशिवाय तातडीच्या तसेच महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणीद्वारे २०, २३, २७, ३० एप्रिल आणि ५ मे रोजी सुनावमी घेण्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. आतापर्यंत केवळ दोनच न्यायमूर्ती फौजदारी आणि दिवाणी याचिकांवर सुनावणी घेत होते. परंतु या तारखांना पाच न्यायमूर्ती स्वतंत्रपणे विविध विषयांवरील याचिकांवर सुनावणी घेतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.