राज्यात मंत्रीपद मिळणार असल्याचा दावा
केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी भाजपने देऊ केलेली विधान परिषदेची आमदारकी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी व पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी आमदारकी नसली तरी, राज्यात रिपाइंला एक मंत्रिपद मिळणारच आहे, असा दावा आठवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
भाजपने विधानसभा निवडणुकीत लेखी आश्वासन देऊनही आठवले यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे पक्षात नाराजी आहे. त्याची दखल घेऊन भाजपने राज्यात मित्र पक्षांना विधान परिषदेची आमदारकी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रिपाइंचे नाव देण्यास सांगण्यात आले. परंतु त्याचवेळी आठवले यांनी केंद्रातील मंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रात मंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत राज्याच्या सत्तेत सहभागी व्हायचे नाही, असा पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याची घोषणा आमदारकी व मंत्रीपदासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांकडूनच करवून घेतली. परंतु केंद्रातील मंत्रीपदासाठी राज्यात एका कार्यकर्त्यांला मिळणारी आमदारकी नाकारण्याच्या आठवले यांच्या भूमिकेवर पक्षातून टीका होऊ लागली.
रामदास आठवले यांच्या भूमिकेला विरोध असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची उद्या शनिवारी नागपूर येथे बैठक होणार आहे.