काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पाच जागांच्या अदलाबदलीवरून महाआघाडीचे घोडे अडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते परिवर्तन यात्रेत गुंतले आहेत आणि काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला २१ जानेवारीपासून सुरुवात होत आहे, त्यानंतरच दोन्ही काँग्रेसमध्ये पुन्हा चर्चा होईल, असे सांगण्यात येते.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या विरोधात महाआघाडी उभी करण्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार आधी लोकसभेच्या जागांचे दोन्ही काँग्रेसमध्ये कसे वाटप करायचे आणि मित्र पक्षांना किती जागा सोडायच्या यावर सहा महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. महिनाभरापूर्वी बैठकीत लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागांवर दोन्ही काँग्रेसचे एकमत झाले आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले होते.

काही जागांच्या अदलाबदलीचा विषय आहे, त्यावर दिल्लीत तोडगा निघेल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार अलीकडेच दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली. मात्र त्यात काय निर्णय झाला हे अजून बाहेर आलेले नाही. त्यानंतर मुंबईत काही ठरावीक नेत्यांचीच बैठक झाल्याचे कळते. मात्र पाच जागांवरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याने अद्याप त्यावर तोडगा निघाला नसल्याचे सांगण्यात येते.

काहीही करून काँग्रेसला नगरची जागा हवी आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असणार आहेत. त्यामुळे नगरची जागा हवीच, असा आग्रह काँग्रेसचा आहे. राष्ट्रवादी ही जागा सहजासहजी सोडायला तयार नाही. त्यासाठी त्यांनी काँग्रेसकडे असलेल्या औरंगाबाद व नंदूरबारची मागणी केली आहे. त्यानंतर आता अमरावती व बुलढाण्यावरूनही वाद सुरू असल्याचे कळते. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितले आहेत. काँग्रेसनेही त्यावर दावा सांगितला आहे. अशा पाच मतदारसंघांवरून रस्सीखेच सुरू झाल्याने आघाडीची चर्चा सध्या थांबली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने १० जानेवारीपासून परिवर्तन यात्रा सुरू केली आहे.  तर, काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला २१ जानेवारीपासून कोकणातून सुरुवात होणार आहे. सावंतवाडीतील जाहीर सभेने संघर्ष यात्रेला सुरुवात होईल व पुढे रत्नागिरी, रायगड ठाणे जिल्ह्य़ात अनेक कार्यक्रम घेऊन २५ जानेवारीला भिवंडीत जाहीर सभेनेच सांगता होणार आहे. त्यानुसार २५ जानेवारीनंतर पुन्हा जागावाटप व आघाडीच्या वाटाघाटी सुरू होतील, असे सांगण्यात आले.