सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी काँग्रेस नेते राणे व भाजपमध्ये खल सुरू असल्याची चर्चा असली तरी अन्य पक्षांतून थेट भाजपवासी झालेल्या नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधींना सत्तापदे मिळालेली नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपवासी झालेले डझनभर आमदार सत्तपदांपासून दूरच राहिले आहेत. त्यामुळे राणे व त्यांच्या समर्थकांना भाजपकडून काही मिळेल की पक्षप्रवेशाच्या नुसत्याच वावडय़ांवर राणे यांना झुलवत ठेवले जाणार, अशी चर्चा सुरू आहे.

अन्य पक्षांतील एखादा तगडा नेता काँग्रेसमध्ये दाखल होत असेल, तर त्यासाठी त्यांना काही सत्तापदे देण्याची त्या पक्षाची तयारी असते. १९९१ मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले होते. राष्ट्रवादीत गेल्यानंतरही भुजबळ सत्तापदांच्या रांगेत पहिल्या क्रमांकावर राहिले. राज्यात जनता दलाचा प्रभाव होता, त्यावेळी बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली आठ-दहा आमदारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन झाला होता. त्या वेळी पातपुते यांना मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले होते.

शिवसेनेला हादरा देऊन नारायण राणे २००५ मध्ये दहा-बारा आमदारांसह काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यावेळी राणे यांना लगेचच महसूल हे महत्त्वाचे खाते देऊन मंत्री करण्यात आले. कालांतराने राणे यांचे एक समर्थक विजय वडेट्टिवार यांनाही राज्यमंत्री करण्यात आले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व अन्य पक्षांचे काही आमदार, पदाधिकारी भाजपध्ये दाखल झाले व निवडूनही आले. त्यात डॉ. वियजकुमार गावित, किसन कथोरे, लक्ष्मणराव जगताप, शिवाजी कर्डिले, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, प्रकाश भारसाखळे, राम कदम, विलास जगताप, डॉ. सुनील देशमुख, भारती लव्हेकर, मिलिंद माने, आदींचा समावेश आहे. डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. हीना गावित आणि काँग्रेसचे नाना पटोले भाजपमध्ये गेले व खासदार झाले. परंतु थेट भाजपमध्ये गेलेल्या व निवडून आलेल्या अन्य पक्षांतील आमदार-खासदारांना सत्तापदांपासून दूरच राहावे लागले आहे.

भाजपबरोबर युती केलेल्या पक्षांना मात्र कमी-अधिक प्रमाणात सत्तेत सहभाग मिळाला आहे. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्री पद आणि राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या दीपक केसकर यांना राज्यमंत्रिपदाचे बक्षीस मिळाले आहे.