सुशोभिकरणावरून पालिका अधिकाऱ्यांमध्ये नवा वाद

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील दादाभाई नौरोजी मार्गावरील कोसळलेल्या हिमालय पुलावरुन पालिका अधिकाऱ्यांमध्येच नवा वाद निर्माण होऊ लागला आहे.

‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी केलेल्या पुलाच्या सुशोभिकरणावरुन तांत्रिक सल्लागार आणि पूल विभागाने ‘ए’ विभाग कार्यालयाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. मात्र, या कामाबाबत ‘ए’ विभाग कार्यालयाने पूल विभागाशी पत्रव्यवहार केल्याचे आणि या कामासाठी पूल विभागानेच निधी दिल्याचे उघडकीस आले आहे. पुलाच्या सुशोभिकरणाबाबत तत्कालिन अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीस ‘ए’ विभाग कार्यालय आणि पूल विभागातील अधिकारीही उपस्थित होते. या पुलाचे सुशोभिकरण ‘ए’ विभागाने करावे आणि त्यासाठी येणारा खर्च पूल विभागाने करावा, असे निर्देश बैठकी देण्यात आल्याचे समजते. सुशोभिकरणाच्या कामासाठी हा पूल २२ डिसेंबर २०१६ ते १० जानेवारी २०१७ या कालावधीत पादचाऱ्यांसाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे ‘ए’ विभाग कार्यालयाने स्थानिक पोलीस ठाणे आणि रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून कळविले होते. त्याचबरोबर पुलाची संरचनात्मक कामे करण्याची गरज असल्यास ती या काळात करावी, असे ‘ए’ विभागाने पूल विभागातील अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविल्याचे समजते. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशी अहवालात तांत्रिक सल्लागाराने २६ डिसेंबर २०१६ रोजी या पुलाची पाहणी केल्याचे आणि ४ जुलै २०१७ रोजी आवश्यक त्या चाचण्या करुन १३ ऑगस्ट २०१८ रोजी अंतिम अहवाल सादर केल्याचे नमुद करण्यात आले आहे. ‘स्वच्छ भारत’च्या निमित्ताने सुशोभिकरणाचे काम सुरू असताना सल्लागाराने पुलाची पाहणी केल्याचे उघड होत आहे. सुशोभिकरणाचे काम सुरू असतानाच पुलाच्या चाचण्या केल्या असता तर अनेक बाबी त्याच वेळी समोर आल्या असत्या. मात्र सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सल्लागाराने चाचण्या केल्याचे अहवालावरुन उघड होत आहे.

सुशोभिकरणादरम्यान पूल विभागाने हिमालय पुलाची संरचनात्मक कामे केली असती किंवा सल्लागाराने या दरम्यान चाचण्या केल्या असत्या तर पुलाची नेमकी स्थिती लक्षात येऊ शकली असती. त्यामुळे दुर्घटना टळली असती, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.