निरुपम यांची नगरसेवकांशी चर्चा

शिवसेना आणि भाजपकडून अन्य पक्षांच्या नगरसेवकांना गळाला लावण्याची स्पर्धा लागल्याने काँग्रेसचे नेते सावध झाले आहेत. या संदर्भात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षाच्या नगरसेवकांशी चर्चा केली.

मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचे भाजपचे अनेक दिवस प्रयत्न सुरू आहेत. काही नगरसेवकांशी भाजपच्या नेत्यांशी चर्चाही केली आहे.

मुंबई काँग्रेसचे ४० नगरसेवक असून, सर्वाशी चर्चा निरुपम सध्या करीत आहेत. पक्षाचे ११ मुस्लीम नगरसेवक असून, ते भाजपबरोबर जाण्याची शक्यता नाही. ८ ते १० जण भाजपच्या विरोधात निवडून आले आहेत. ते फुटण्याची शक्यता कमी आहे. आठ ते दहा नगरसेवकांबाबत पक्षात संशयाचे वातावरण आहे.

सर्व नगरसेवकांशी चर्चा केल्यावर फुटण्याची शक्यता सर्वानीच फेटाळून लावली. त्यातच भाजपच्या विरोधात निर्माण झालेल्या वातावरणामुळे नगरसेवक भाजपबरोबर जातील याबाबत साशंकता आहे. दोन तृतीयांश नगरसेवक फोडणे तेवढे सोपे नाही. कारण २५ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला तरच पक्षांतरबंदीच्या कचाटय़ात नगरसेवक सापडणार नाहीत. आठ ते दहा जणांनी राजीनामा दिला तरी त्यांना निवडून येणे  सोपे नाही.