बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील फुटीर नेत्यांनी एकत्र येऊन पर्यायी बहुजन आघाडी उभी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. बसपमधील फुटीर गटांसह १७ राजकीय व बिगरराजकीय पक्ष-संघटनांनी एकत्र येऊन बसपचे संस्थापक कांशिराम यांच्या बहुजन संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले आहे. त्याबाबतची एक महत्त्वाची बैठक येत्या शनिवारी (ता. २६ ऑगस्ट) दिल्ली येथे होणार आहे.

२००७ मध्ये उत्तर प्रदेशची पूर्ण ताकदीने सत्ता हातात घेणाऱ्या मायावती यांच्या राजकारणाला मात्र नंतरच्या काळात उतरती कळा लागली. २०१२ च्या निवडणुकीत सत्ता गेली. पाच-सहा महिन्यांपूर्वी झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निडणुकीत तर बसपचा सुफडा साफ झाला. मात्र त्याआधीपासूनच मायावती यांच्या कार्यशैलीवर नाराज असणारे काही महत्त्वाचे नेते, पदाधिकारी पक्षातून बाहेर पडू लागले होते. एके काळी बसपमध्ये असलेले व ज्यांना बहुजन ही संकल्पना मान्य आहे, अशा राजकीय व बिगरराजकीय संघटांनी एकत्र येऊन बसपला पर्याय म्हणून वेगळी आघाडी उभी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्या संदर्भात आतापर्यंत २५ एप्रिल ते ६ ऑगस्ट २०१७ या कालावधीत दिल्ली, नागपूर, लखनौ या ठिकाणी पाच बैठका झाल्या आहेत. शनिवारी दिल्लीत बैठक होणार असून त्यात बहुजन आघाडीचे धोरण ठरविले जाणार आहे, अशी माहिती या आघाडीचे एक संयोजक डॉ. सुरेश माने यांनी दिली.

बसपचे संस्थापक कांशिराम यांनी बहुजन ही संकल्पना मांडून उत्तर प्रदेशात प्रस्थापित पक्षांना राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशची चार वेळा बसपला सत्ता मिळणे हे त्याचे फलित मानले जाते. परंतु पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वाने कांशिराम यांच्या मूळ बहुजन या संकल्पनेशी फारकत घेतली आहे. उत्तर प्रदेशातील पराभवाचे ते एक महत्त्वाचे कारण आहे, असे फुटीर गटांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कांशिराम यांची बहुजनवादी राजकारणाची मूळ संकल्पना घेऊन, केवळ मायावती यांच्याविरोधात नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि काँग्रेसप्रणीत पुरोगामी लोकशाही आघाडी यांनाही पर्याय म्हणून बहुजन आघाडीची उभारणी करण्यात येणार आहे, असे डॉ. माने यांनी सांगितले.